Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:51 IST2025-11-06T13:50:19+5:302025-11-06T13:51:12+5:30
Pune Leopard Attack: बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली, अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याच्या पंजा स्वेटर मध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले आणि त्या थोडक्यात बचावल्या

Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना
अवसरी : पारगाव ता. आंबेगाव चिचगाईवस्ती येथे शनिवारी रात्री नऊ वाजता बिबट्याने अश्विनी शिवाजी ढोबळे (वय २९) या महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला असून महिला थोडक्यात बचावली आहे. बिबट्याने महिलेच्या अंगावरील स्वेटर ओढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. घाबरलेल्या अश्विनी ढोबळे यांना पारगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. यावेळी मंचर येथील वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी रुग्णालयात जाऊन ढोबळे यांची भेट घेऊन घडलेल्या ठिकाणी तातडीने पिंजरा लावला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, अश्विनी शिवाजी ढोबळे या रविवारी रात्री ९ वाजता गाई गोठ्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेल्या होत्या. बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली. अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याच्या पंजा स्वेटर मध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले. या हल्ल्यातून ढोबळे थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र यामुळे अश्विनी या काही वेळ बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ पारगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार घेऊन त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आले. घडलेल्या प्रकार मंचर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांना भ्रमणध्वनीवरून कळविल्यानंतर अधिकारी विकास भोसले व त्यांचे कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली त्यानंतर घडलेल्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, भीमाशंकर कारखाना संचालक माऊली आस्वारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी ढोबळे यांचे घरी जाऊन त्यांची विचारपूस केली.