leopard attack on young man: दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:43 IST2021-12-28T15:43:42+5:302021-12-28T15:43:51+5:30
डिझेल आणण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले

leopard attack on young man: दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; तरुण जखमी
मंचर : डिझेल आणण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील कासार मळ्यात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. तानाजी प्रभाकर झांबरे ( रा.वळती ता .आंबेगाव ) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
शिंगवे येथे भागडी रस्त्यावर कासार मळा आहे. तेथे वळती येथील तानाजी प्रभाकर झांबरे हे डिझेल आणण्यासाठी भीमाशंकर कारखाना येथे दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचा डावा पाय बिबट्याने तोंडात पकडला. परंतु तानाजी झांबरे याने प्रसंगावधान राखून गाडी तशीच पुढे जलद गतीने नेल्यामुळे बिबट्याने त्यांचा पाय सोडून दिला.
यामुळे त्यांचे प्राण वाचले असून तरुण वाचला आहे. त्याच्या पायाला बिबट्याचे दात व नख लागले आहेत. स्थानिक तरुणांनी तानाजी झांबरे यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत आहे. तालुक्यात बिबट्याने माणसावर हल्ला करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.