तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये व भीमाशंकर अभारण्य परिसरामध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने या भागातील आदिवासी बांधव धास्तावले आहेत. वनविभागाने तात्काळ दखल घेत या बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी आदिवासी जनतेने वनविभागाकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये वाघाचा वावर आढळत आहे. यामध्ये पाटण खोऱ्यातील कुशिरे पाटण, पिंपरी, साकेरी, मेघोली, जांभोरी, कळंबई, चिखली तळेघर, फळोदे निगडाळे राजपुर म्हातारबाचीवाडी आदी गावांमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळुन आला आहे. यामध्ये मागील आठवड्यामध्ये जांभोरी ह्या गावातील भागुजी रामजी केंगले ह्या अत्यंत गरीब आदिवासी शेतकऱ्यांनी आपली जनावरे सकाळी साडे आठच्या सुमारास चरावयासाठी सोडली होती. माचीची वाडी या वस्तीच्या अगदी खालीच असणाऱ्या माची वस्ती जवळ इरा रान येथे बिबट्याने जाणत्या अशा शेळी वरती हल्ला करुन जागीच ठार केले. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयर सुतक नाही. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व अधिकारी हे चाळीस ते पन्नास की.मी. अंतरावर असणाऱ्या घोडेगाव येथे ऑफिसमध्ये बसुन असतात. त्यांना आदिवासी भागामध्ये फिरण्यासाठी वेळ नाही.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर हे सहावे ज्योर्तिर्लिंग तसेच भीमाशंकर अभयारण्य क्र. दोन म्हणुन प्रसिद्ध असे अभयारण्य आहे. ह्या अभयारण्याच्या रक्षणासाठी वनविभाकडुन भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात पद भरलेली आहेत. यामध्ये वनपरिक्षेञ अधिकारी वनपाल वनरक्षक तसेच वनकर्मचारी असा मोठा फौज फाटा देण्यात आला. हे अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी सुसज्ज अशी निवासस्थाने व उत्तम अशी कार्यालय उभारण्यात आली आहेत. परंतु हे अधिकारी व कर्मचारी मनमानी करत मंचर, पुणे, घोडेगाव, अशा ठिकाणी राहत आठवड्यातुन फक्त एकदाच आपल्या सोईनुसार भीमाशंकर या ठिकाणी येत असल्यामुळे ह्या अभयारण्याची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. आदिवासी भागामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवडाभरापासून बिबटे अनेक ठिकाणी वावर आढळत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.