AFMC मध्ये विद्यार्थी ते संचालकपदापर्यंत झेप! आरती सरीन यांचा प्रेरणादायी प्रवास
By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: October 7, 2022 20:04 IST2022-10-07T20:03:52+5:302022-10-07T20:04:57+5:30
एएफएमसीच्या त्या माजी विद्यार्थी असून, आता या संस्थेच्या त्या संचालक बनल्या आहेत...

AFMC मध्ये विद्यार्थी ते संचालकपदापर्यंत झेप! आरती सरीन यांचा प्रेरणादायी प्रवास
पुणे : लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) संचालक आणि प्रमुखपदी सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपला पदभार नुकताच स्वीकारला. एएफएमसीच्या त्या माजी विद्यार्थी असून, आता या संस्थेच्या त्या संचालक बनल्या आहेत.
त्यांनी ३७ वर्षांच्या सेवा काळात महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय नियुक्त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. दिल्लीतील आर. आर. लष्करी रुग्णालय आणि कमांड रुग्णालय, पुण्यातील एएफएमसी येथील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख, मुंबई येथील आयएनएस अश्विनीच्या कमांडंट या पदांचा समावेश आहे. उत्कृष्ट कारकिर्दीसाठी त्यांना २००१ मध्ये नेव्हल स्टाफ कमेंडेशन, २०१३ मध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ कमेंडेशन, २०१७ मध्ये ‘आर्मी स्टाफ कमेंडेशन’ आणि २०२१ मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले आहे.
व्हाइस ॲडमिरल सरीन या एएफएमसीच्या माजी विद्यार्थी असून, २६ डिसेंबर १९८५ मध्ये त्यांची सशस्त्र वैद्यकीय सेवांमध्ये (एएफएमएस) नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुण्यातील एएफएमसीमधून रेडिओडायग्नोसिस आणि मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधून रेडिएशन ऑन्कोलॉजीमधील विशेष प्रावीण्यासह पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. याव्यतिरिक्त पिट्सबर्ग विद्यापीठात गामा नाईफ सर्जरीचे प्रशिक्षण सरीन यांनी पूर्ण केले आहे.