गळतीमुळे घरे, शाळेला धोका
By Admin | Updated: March 23, 2017 04:12 IST2017-03-23T04:12:15+5:302017-03-23T04:12:15+5:30
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीमुळे कालव्याच्या परिसरातील घरे व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक

गळतीमुळे घरे, शाळेला धोका
उरुळी कांचन : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीमुळे कालव्याच्या परिसरातील घरे व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत कुंजीरवाडी ग्रामस्थांच्या वतीने बेबी कालव्याच्या अस्तरीकरणाची मागणी हवेली तालुका शिवसेना विभागप्रमुख स्वप्निल कुंजीर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कपोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
बेबी कालव्यावर उभारण्यात आलेल्या पुलाच्या कमी व्यासाच्या नळ्या व कालव्यामध्ये सतत वाढणारी जलपर्णी यामुळे पाण्याचा प्रवाह वाहण्यासाठी अडथळा निर्माण होऊन पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढत आहे. वर्षभरापासून सुरू केलेल्या या बेबी कालव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मात्र लोकवस्तीच्या ठिकाणी होणाऱ्या पाणीगळतीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत खराब झाले आहेत, तसेच झिरपणाऱ्या पाण्यामुळे घरांच्या भिंती, जिल्हा परिषद शाळा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सोमवार (दि. १३) कुंजीर यांनी उपजिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे कालव्याच्या अस्तरीकरणाची मागणी केली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी मुठे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कपोले यांनी कालव्याच्या अस्तरीकरणासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून पाणीगळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आदेश संबंधित उपविभागाचे उपअभियंता बी. डी. थोरात यांना दिले. (वार्ताहर)