Pune | भाजपमधील नेतृत्वाची पोकळी, अंतर्गत कलहाला मोकळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:32 PM2023-08-11T18:32:40+5:302023-08-11T18:35:47+5:30

या हालचालींना आता पाचवा महिना उजाडलाय, तरी लोकसभेचा चेहरा कोण असेल ? हा कायम असलेला प्रश्न भाजपमध्ये अंतर्गत कलहाला बळ देतोय...

Leadership vacuum in BJP, open to internal strife pune latest political news | Pune | भाजपमधील नेतृत्वाची पोकळी, अंतर्गत कलहाला मोकळी 

Pune | भाजपमधील नेतृत्वाची पोकळी, अंतर्गत कलहाला मोकळी 

googlenewsNext

- सचिन कापसे

पुणे : फेब्रुवारीत भाजपच्या हातातून कसबा निसटला. मार्चमध्ये गिरीश बापट यांचे निधन झाले. बापटांच्या चितेला अग्नी देण्याआधीच लोकसभा उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली. एप्रिल महिन्यात पक्षाकडून उमेदवाराची चाचपणीही करण्यात आली. या हालचालींना आता पाचवा महिना उजाडलाय, तरी लोकसभेचा चेहरा कोण असेल ? हा कायम असलेला प्रश्न भाजपमध्ये अंतर्गत कलहाला बळ देतोय. 

सहा- आठ महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. कसब्यातील पराभवानंतर तर भाजप अतिशय आक्रमकतेने पुण्यात काम करत आहे. पंतप्रधानांपासून तर प्रदेशाध्यक्षपर्यंत सर्वांचे दौरे कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरले आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी ताब्यात असणे किती आवश्यक आहे, याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळेच लोकसभेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा फोकस आहे. मात्र, स्थानिक चेहरा पक्षाकडून पुढे करण्यात येत नसल्यामुळे कार्यकर्ते गट-तटाच्या राजकारणात अडकले आहेत.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. आता लोकसभेची निवडणूक थेट २०२४ मध्येच होणार असल्यामुळे कुठल्याही नावावर अजून एकमत झालेले नाही. सर्वच इच्छुकांची ताकद एका विधानसभा मतदारसंघाच्या पुढे नसल्यामुळे भाजपने सावध पवित्रा घेत चाचपणी सुरू ठेवली आहे. सर्व्हेच्या माध्यमातून मतदारांचा कौल समजून घेण्याचा प्रयत्न पक्षपातळीवर सुरू आहे. कोअर ग्रुपमधील काही पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या लोकांची भूमिका समजून घेण्याच्या तसेच माध्यमांच्या संपर्कात राहून केंद्राची कामे अधोरेखित करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. 

पुणे लोकसभा क्षेत्रातील ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. १ आमदार अजित पवार गटाचे तर १ काँग्रेसचे आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर लोकसभा भाजपसाठी आघाडीच्या तुलनेत फार आव्हानात्मक नसली तरी अंतर्गत कलहामुळे डोकेदुखी वाढणारी निश्चित असणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, मेधा कुलकर्णी, माजी खासदार संजय काकडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. 

कसबा ठरणार महत्त्वाचा फॅक्टर 
विधानसभेला कसब्यात मुक्ता टिळकांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली, तशीच लोकसभेला स्वरदा बापटांना नाकारली तर चुकीचा मेसेज जाण्याची भीती भाजपला आहे. त्यामुळे जर काँग्रेसच्या हातातून भविष्यात कसबा परत मिळवायचा असेल तर स्वरदा बापट यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दुसरीकडे काँग्रेसकडेही लोकसभेसाठी चेहरा नसल्यामुळे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेला आघाडीकडून संधी मिळू शकते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघ केंद्रस्थानी असणार आहे. 

‘कोथरूड’चा कलह 
 २०१९च्या विधानसभेला चंद्रकांत पाटील यांच्यासाठी स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांना थांबविण्यात आले होते. त्यानंतर मागील ४ वर्षात त्यांचे राजकीय पुनर्वसन झालेले नाही. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देताना कुलकर्णी यांना विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आल्याच्या चर्चा होत्या, तेही त्यांना अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळे आता लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. याच मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचेही चांगले काम आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे अगदी जवळचे म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्याही नावाची लोकसभेसाठी चर्चा आहे. त्यांच्यावर तर पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रबळ दावेदार मानल्या जातात. हा मतदारसंघात अंतर्गत कलहाची बीजे रुजली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. 

शिवाजीनगरमध्ये कस लागणार 
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आमदार आहेत. २०१९ ला या मतदारसंघातुन अवघ्या ५ हजारांनी शिरोळे विजयी झाले होते. ५३६०० मते काँग्रेसच्या उमेदवाराने घेतली होती. या मतदारसंघावर भाजपच्या अनेक इच्छुकांचा डोळा आहे. लोकसभेच्या मतांचे विश्लेषण विधानसभेचा उमेदवार ठरवणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभेला लीड मिळवण्यासाठी भाजपचा कस लागणार आहे. सर्वमान्य उमेदवार मैदानात नसल्यास हा मतदारसंघ भाजपला अडचणीचा ठरू शकेल. 

वडगाव शेरी कुणासोबत? 
वडगाव शेरी मतदारसंघातील माजी आमदार जगदीश मुळीक लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार आहेत. आता बदललेल्या राजकीय समीकरणानुसार अजित पवार गटाची मदत भाजपाला होईल. पण जर मुळीक उमेदवार असले तर टिंगरे मदत करतील का ? आणि भाजपने तिकीट नाकारले तर मुळीक काय करतील ? याची चर्चा वडगाव शेरी मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघात अंतर्गत राजकारणाचा फटका भाजपच्या लोकसभेच्या उमेदवाराला बसू शकेल.  

काॅन्टेंमेंट मतदारसंघात जातीय समीकरणे वरचढ 
२०१४ पासून छावणी मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. २०१९ ला अवघ्या ५ हजार मतांनी काँग्रेसचे रमेश बागवे पराभूत झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघात भाजपाला मोठी कसरत करावी लागणार आहे. जातीय आणि धार्मिक समीकरणे सांभाळत भाजपला पुढे जावे लागणार आहे. तरच छावणीतून भाजपला आघाडी मिळू शकेल.  
पर्वती मतदारसंघात गरीब, मध्यमवर्गीय निर्णायक  
जवळपास ४ लाख १६ हजार मतदारांच्या गर्दीत गरीब मध्यमवर्गीयच निर्णायक मतदान करतात, हा आजवरचा ट्रेंड राहिला आहे. २००९ मध्ये जेव्हा माधुरी मिसाळ पर्वती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. तेव्हा तेथे भाजपचे केवळ तीन नगरसेवक होते आणि सध्या पंचवीस नगरसेवक आहेत. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. या मतदारसंघातील अल्प उत्पन्न गटाचे मतदार हातात काहीच लागले नसल्यामुळे निराश आहेत. त्याचा फटकाही भाजपला बसू शकतो.

मतदारसंघ    आमदार     पक्ष
वडगाव शेरी        सुनिल टिंगरे        राष्ट्रवादी
शिवाजीनगर        सिद्धार्थ शिराेळे    भाजप
काेथरूड         चंद्रकांत पाटील    भाजप
पर्वती               माधुरी मिसाळ    भाजप
पुणे काॅन्टेंमेंट    सुनिल कांबळे    भाजप
कसबा पेठ        रविंद्र धंगेकर        काॅंग्रेस

Web Title: Leadership vacuum in BJP, open to internal strife pune latest political news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.