कसब्यात 'मविआ' चे नेते प्रचारासाठी बाहेर न पडता घरात बसून; चंद्रकांत पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 21:17 IST2023-02-15T21:16:55+5:302023-02-15T21:17:07+5:30
प्रचारासाठी अजून ८ दिवस शिल्लक असून देवेंद्र फडणवीस कसब्याच्या पोटनिवडणुकीत करिश्मा घडवणार

कसब्यात 'मविआ' चे नेते प्रचारासाठी बाहेर न पडता घरात बसून; चंद्रकांत पाटलांचा टोला
पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीतही भाजपची शहर यंत्रणा, शहरातील नेते, राज्याचे काही नेते काम करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष कधीच एकजीव होऊ शकत नाहीत. त्यांचा प्रचार पाहिला तर त्यांचे शहरातील नेते प्रचारासाठी बाहेर न पडता घरात बसून आहेत. यावरूनच त्यांची परिस्थिती ओळखावी,असा टोला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
‘कसब्यामधील नागरिक ‘नोटा’चा वापर करतील’, या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचाही पाटील यांनी समाचार घेतला. सुजाण नागरिक कधीही नोटाचा वापर करत नाहीत. संजय राऊत कदाचित कसब्यातील नागरिकांना सुजाण समजत नाहीत. म्हणूनच त्यांना असे वाटते आहे, असे प्रत्युत्तर पाटील यांनी राऊत यांना उद्देशून दिले.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आणि धुर्त राजकारणी आहेत. त्यांना कसब्यातील संपूर्ण परिस्थिती माहिती आहे. प्रचारासाठी अजून आठ दिवस शिल्लक आहेत. या दिवसांमध्ये काय करायचे, हे फडणवीस यांना चांगलेच कळते, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस कसब्याच्या पोटनिवडणुकीत करिश्मा घडवणार असल्याचे सुतोवाच केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी ‘धर्मवीर’ हीच पदवी योग्य
वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावात बदल करण्याचा निर्णय नुकताच कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या ऐवजी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उल्लेख केला जाणार आहे. या निर्णयाचे पाटील यांनी समर्थन केले. आजपर्यंत ज्यांनी चुकीचा, खोटा इतिहास पसरवला त्यांना आम्ही उत्तर देत असून ‘धर्मवीर’ हाच शब्द योग्य असल्याची पुनरावृत्ती पाटील यांनी केली.