राजकीय हेवेदावे, मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी दाखविला ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:58 AM2023-01-04T11:58:51+5:302023-01-04T11:59:41+5:30

आपला कोणताही राजकीय सहकारी अडचणीत असेल तेव्हा त्यांना मदतीचा ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’चा नवीन अध्याय राजकारण्यांनी घातला...

laxman jagtap passed away Forgetting political differences and differences, the leaders of all parties showed 'politics with respect'. | राजकीय हेवेदावे, मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी दाखविला ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’

राजकीय हेवेदावे, मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी दाखविला ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’

Next

- हणमंत पाटील

पिंपरी : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे एक वर्षापासून आजारी होते. या काळात राजकीय हेवेदावे, मतभेद विसरून राज्यातील व शहरातील नेत्यांनी आमदार जगताप व कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून धीर दिला. आपला कोणताही राजकीय सहकारी अडचणीत असेल तेव्हा त्यांना मदतीचा ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’चा नवीन अध्याय राजकारण्यांनी घातला.

गेल्या ३५ वर्षांपासून आमदार जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर ते आमदार असा त्याचा राजकीय आलेख चढता राहिला. मात्र, दोन वेळा प्रयत्न करूनही लोकसभा निवडणुकीद्वारे खासदार होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. राजकारणात कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाने विरोधकांनाही कायम आपलेसे केले. ‘वन मॅन आर्मी’प्रमाणे ते ज्या पक्षात जातील, तेथे कार्यकर्त्यांचा जत्था त्यांच्या सोबत कायम होता. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करूनही चिंचवड मतदारसंघात विजय खेचून आणला.

एकेकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले लक्ष्मण जगताप यांनी पक्षांतर केल्यानंतर महापालिकेत सत्तापालट घडवून आणला. भविष्यातील बदलती राजकीय समीकरणे ओळखून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्याविषयीची निष्ठा व आदर कायम होता. तसेच, माजी आमदार विलास लांडे यांच्याशी असलेली मैत्री राजकारणापलीकडची होती. त्याचा प्रत्यय ते आजारी असताना आला.

२०१९ ला केंद्रात भाजपची व राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता होती. जगताप यांच्या उपचारासाठी काही औषधे अमेरिकेतून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून परवानगीची गरज होती. मात्र, पक्षांतर, बंडखोरी व राजकीय विरोध बाजूला ठेवून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे हे त्यांच्या मदतीसाठी धावून आले. तसेच, केंद्र शासनाकडून आवश्यक परवानगीसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व डॉ. भारती पवार यांनी मदत केली. आमदार जगताप यांनी राजकारणापलीकडे जपलेली निष्ठा व मैत्री त्यांच्या अडचणीच्या काळात कामी आली होती.

Web Title: laxman jagtap passed away Forgetting political differences and differences, the leaders of all parties showed 'politics with respect'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.