पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा दर वाढताना दिसत आहे. एकीकडे दररोज चोऱ्या, खून, दरोडे, फसवणुकीचे प्रकार घडत आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सामाजिक वातावरण अस्वस्थ होत आहे. गेल्या वर्षी शहरात बलात्काराच्या २३६ व विनयभंगाच्या ५१६ घटना घडल्या आहेत. पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण शंभर टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात शहरात महिला कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे पोलीस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेकरिता वेगवेगळ्या प्रकारे यंत्रणा राबविल्या असून त्या प्रभावीपणे कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी महिलांच्या सुरक्षेकरिता महिला बीटमार्शल यांची नेमणूक करण्यात आली आहे. यात १ पोलीस उपनिरीक्षक व २९ महिला पोलीस कर्मचारी बीटमार्शल म्हणून कार्यरत आहेत. अशा प्रकारे १४ महिला बीटमार्शल (दामिनी पथक) असून त्यांच्यामार्फत प्रत्येकी दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियंत्रण ठेवले जाते. विशेष म्हणजे शहरातील शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस महिला बीटमार्शल पेट्रोलिंग करतात. २०१७ मध्ये बलात्काराच्या एकूण २६५ घटना घडल्या. यापैकी २६३ गुन्हे उघड झाले, तर विनयभंगाचे ५१० गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ५०६ घटनांमधील आरोपींना पकडण्यात प्रशासनाला यश आले. पोलीस प्रशासनाने वार्षिक अहवालातून प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मागील दहा वर्षांतील सरासरी विनयभंगाची आकडेवारी २८७ असून या गुन्ह्यांच्या तपासाची सरासरी टक्केवारी ९७.७ इतकी आहे. मागील दहा वर्षांतील सरासरी बलात्कारांची संख्या १४६ इतकी आहे. त्या गुन्ह्यांच्या तपासाच्या आकडेवारीची सरासरी संख्या ९८ आहे.
- महिलांच्या सुरक्षेसाठी २४ बाय ७ तास सतर्क बडीकॉपची आकडेवारी
एकूण पोलीस अधिकारी-कर्मचारी | १८८ |
व्हॉट्सअॅप ग्रुपची संख्या | ४२३१ |
कंपन्या / इतर संख्या | ५५७ |
पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील महिलांची संख्या | ४१६६१ |
एकूण संख्या | ७०४१० |
- दरवेळी पोलीस प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आता पालकांनी पाल्याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. हल्ली मुले ऐकत नाहीत. शाळेतल्या मुली धाडसाने मोठ्या मुलांबरोबर फिरताना दिसतात. मुलींनादेखील परखडपणे काही गोष्टींची समज देणे महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांना पाठीशी घालू नये. त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा प्रतिष्ठेला धक्का लागेल, या भीतीपोटी अनेक जण पाल्यांच्या चुकांवर पांघरुण घालतात. पाल्यांना बेफिकिरीत वाढविण्याची चूक पालकांनी करू नये.
- अॅड. शैलजा मोळक, सामाजिक कार्यकर्त्या
- ओळखीच्या व्यक्तीकडून विनयभंगाच्या अनेक घटना दिसून येतात. मात्र बलात्काराच्या घटनेबाबत सांगायचे झाल्यास यात पूर्णपणे ओळख प्रस्थापित झाल्यानंतर त्याचे रुपांतर मैत्रीत होणे, प्रेमाच्या, लग्नाच्या आणाभाका घेणे, त्यानंतर झालेल्या वादातून या घटना घडतात. मुलींनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने सज्ञान मुलींचे, महिलांचे प्रमाण या प्रकारच्या घटनांमध्ये मोठे असून निरक्षर, अज्ञानी महिलांची फसवणूक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मुलींनी आपले मित्र कोण आहेत, आपल्या संगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- शिवाजी बोडखे, सह पोलीस आयुक्त, पुणे