अकरावी प्रवेशासाठी अखेरची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:33 AM2018-09-20T03:33:46+5:302018-09-20T03:34:12+5:30

अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेरच्या टप्प्यावर असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १९ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही शेवटची फेरी राबविली जाणार आहे

The last chance for eleven entrants | अकरावी प्रवेशासाठी अखेरची संधी

अकरावी प्रवेशासाठी अखेरची संधी

Next

पुणे : अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेरच्या टप्प्यावर असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १९ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही शेवटची फेरी राबविली जाणार आहे. यानंतर प्रवेशासाठी कोणतीही फेरी घेतली जाणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय पध्दतीने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया पार पाडली जात आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या ७ फेºया पार पडल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार अर्ज आले होते, त्यापैकी ९५ टक्के प्रवेश पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अद्याप प्रवेशासाठी अर्ज न भरलेले विद्यार्थी, अद्याप कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, काही कारणास्तव प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, प्रवेश नाकारले गेलेले विद्यार्थी या सर्वांना प्रवेश फेरीत सहभागी होता येणार आहे.
विद्यार्थ्यांना १९ ते २२ सप्टेंबर पर्यंत नवीन अर्ज करणे, अपूर्ण अर्ज अ‍ॅप्रुव्ह करणे आदी प्रक्रिया पार पाडता येतील. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रांमध्ये जाऊन अर्ज अ‍ॅप्रुव्ह करणे आवश्यक आहे. त्यानंतर २४ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आॅनलाईन क्लिक करून प्रवेश निश्चित करता येईल.
अकरावी प्रवेशाची ही अंतिम फेरी असल्यामुळे पालकांनी रिक्त जागांवरील प्रवेश निश्चित करावेत. या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांसाठी पुढची फेरी राबविली जाणार नाही. त्यानंतर अकरावीसाठी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश दिला जाणार नाही. आॅफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला बसू दिले जात नाही, असे शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत माहिती नाही
अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी राबविण्यात येत आहे. मात्र अद्याप किती विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, याची आकडेवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे किती जागा रिक्त आहेत, किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, याबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाही.

Web Title: The last chance for eleven entrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.