पुण्यात तुळसीबागेतील दुकानांना मोठी आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 22:07 IST2019-01-26T22:07:05+5:302019-01-26T22:07:22+5:30
मंडई परिसरातील तुळशीबागेत असलेल्या दुकानांना शनिवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्यात तुळसीबागेतील दुकानांना मोठी आग
पुणे : मंडई परिसरातील तुळशीबागेत असलेल्या दुकानांना शनिवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही. ही घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त असून या आगीच्या घटनेत किती दुकाने जळाली हे अद्याप समजू शकले नाही.
मंडई परिसरातील वाहनतळजवळ असलेल्या एका दुकानाला आग लागली. आज सुट्टी असल्याने या ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली.
तुळशीबाग हा परिसर नेहमी नागरिकांनी गजबजलेला असतो. या ठिकाणी अनेक प्रकारची छोटी छोटी दुकाने आहेत. आज सुट्टी असल्याने सायंकाळी या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी होती. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या ठिकाणी वाहन पार्किंग असल्याने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली हाती. अर्धा तासच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणणे शक्य झाले.