खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली; १५ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 22:59 IST2019-06-13T22:57:11+5:302019-06-13T22:59:54+5:30
मंकी हिलजवळ दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत

खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली; १५ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम
लोणावळा: मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान लोहमार्गाच्या मिडल आणि डाऊन मार्गावर लोहमार्ग किलोमीटर क्रमांक ११७/५०० येथील एका बोगद्याजवळ पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी रेल्वेसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. आज (गुरुवारी) रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली असून मार्गावर कोसळलेली दरड हटवण्यासाठी व रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. गतवर्षी खंडाळा घाटातील खंडाळा बोगदा ते मंकीहील दरम्यान एका आठवड्यात चारवेळा दरडी कोसळल्या होत्या.
आज दिवसभर लोणावळा आणि खंडाळा घाट माथ्यावर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. खंडाळा घाटातही पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्याने खंडाळा घाटातील मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान मध्य रेल्वेच्या लोहमार्गावर मिडल आणि डाऊन मार्गावर मोठी दरड कोसळल्याने या दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूणर्पणे कोलमडली आहे. लोहमार्गावरील दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती समजल्यावर रेल्वे प्रशासनाने मुंबईहून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस मंकी हिलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर थांबवली. यामुळे सह्याद्रीसह इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या राजकोट, हुबळी, चेन्नई, महालक्ष्मी, लातूर आणि मिडल मार्गाने मुंबईला जाणाऱ्या दुरांतो व चेन्नई अशा एकूण १५ रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.