बनावट कागदपत्रांद्वारे जमीन लाटली; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:51 IST2018-05-27T02:51:00+5:302018-05-27T02:51:00+5:30
तलाठ्याला हाताशी धरून ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेचे वारसदार असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून गोंदी (ता. इंदापूर) येथील जमीन लाटल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन लाटली; तिघांवर गुन्हा
इंदापूर - तलाठ्याला हाताशी धरून ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेचे वारसदार असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून गोंदी (ता. इंदापूर) येथील जमीन लाटल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रय देशमुख, अंगद देशमुख, राहुल देवरे (सर्व रा. गोंदी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. रणजित बाळासाहेब जाधव (वय २८, रा, गोंदी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, की गोंदी गाव जमीन गट नं.८६ मधील सातबारा पत्रकी फिर्यादीच्या नावावर एक हेक्टर क्षेत्र आहे. प्राजक्ता रणजित जाधव, प्रताप बाळासाहेब जाधव, इंदूमती बाळासाहेब जाधव, उत्तम यशवंत जाधव यांच्या नावे उर्वरित क्षेत्र आहे. सदर जमीन गटाच्या इतर अधिकारामध्ये अंजनाबाई रामा देशमुख यांची पोकळस्त नोंद आहे. त्या ६० वर्षांपूर्वी मयत झाल्या आहेत. या जमिनीमध्ये त्यांचा पूर्वीपासून कोणत्याही प्रकारचा हक्क नव्हता. त्यांना जवळचे कोणी नातेवाईक नव्हते. दि.२७ जुलै २०१७ रोजी फिर्यादीने गोंदी येथील गाव कामगार तलाठ्याकडे या जमिनीच्या गटात कोणतीही वारस नोंद घेऊ नये, अशा आशयाचा अर्ज दिला होता. या पार्श्वभूमीवर आरोपींनी वारसांच्या नावे साखर कारखान्याचे शेअर्स करावयाचे आहेत, असे सांगून दत्तात्रय नारायण देशमुख, भागवत नारायण देशमुख, कृत्त्विक नारायण देशमुख, रघुनाथ नारायण देशमुख, विमल नारायण देशमुख, लिलावती भारत पवार, मीराबाई महादेव जाधव, कौशल्या सौदागर काटकर आदींच्या सह्या घेतल्या. त्याचा वापर करून दि. १ डिसेंबर २०१७ रोजी तहसील कार्यालयात जाऊन हे सर्वजण अंजनाबाई देशमुख याचे वारस असल्याचे बनावट प्रतिज्ञापत्र
तयार केले.
गोंदीचे गावकामगार तलाठी राहुल देवरे यांनी वारसदारांची कसलीही स्थानिक चौकशी न करता नारायण पांडुरंग देशमुख यांच्या आठ वारसांची नोंद केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.