किरण शिंदे: पुण्यातील नवले पुलानंतर कात्रज, कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय. सोमवारी या परिसरात झालेल्या एका अपघातात शिक्षिकेला प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी वाहतूक वळवताना नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यातून निर्माण झालेल्या कोंडीत अडकून अपघातग्रस्त शिक्षिकेला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. इस्कॉन चौकाच्या पुढे हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. रमा कापडी (वय ५३, रा. कात्रज, कोंढवा रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. नेहमीप्रमाणे त्या दुचाकीवरून जात असताना, रस्ता वळवण्यात आल्याची कल्पना न आल्याने त्या घाईत उलट्या दिशेने गेल्या. याच वेळी त्या एका भरधाव कंटेनरच्या चाकाखाली सापडल्या. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
दरम्यान, घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी रमा कापडी यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली होती. त्यात नियोजनाचा अभाव असल्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याच कोंडीमुळे रमा कापडी यांना वेळेवर रुग्णालयात दाखल करता आले नाही आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.
रमा कापडी या जे.एस.पी.एम. संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या आपल्या मुलीसोबत राहत होत्या. आईच्या अपघाती निधनानंतर आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कात्रज कोंढवा रस्त्यावरील मुख्य चौकात सलग पाच दिवस कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी होत होती. “रस्ता वळवण्यात आला, पण योग्य सूचना नव्हत्या. याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल शिवसेना नेते वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Web Summary : A teacher died in Pune due to traffic chaos caused by diversions for a CM's event. Lack of planning led to delays in medical assistance after an accident. Locals are outraged; police are investigating.
Web Summary : पुणे में मुख्यमंत्री के कार्यक्रम के कारण यातायात परिवर्तन से अराजकता हुई, जिसमें एक शिक्षिका की मौत हो गई। योजना के अभाव के कारण दुर्घटना के बाद चिकित्सा सहायता में देरी हुई। स्थानीय लोग आक्रोशित हैं; पुलिस जांच कर रही है।