कुरकुंभ एमडी केस: केमिकल इंजिनिअरच्या मदतीने ‘एमडी’चा फॉर्म्युला, कच्चा माल बनवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 10:34 IST2024-02-22T10:34:46+5:302024-02-22T10:34:55+5:30
बचाव पक्षाच्या वतीने आरोपींना कमीत कमी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना २९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली...

कुरकुंभ एमडी केस: केमिकल इंजिनिअरच्या मदतीने ‘एमडी’चा फॉर्म्युला, कच्चा माल बनवला!
पुणे : कुरकुंभ येथे एमडी या अमली पदार्थाच्या निर्मितीप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली होती. बुधवारी (ता. २१) आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांच्या न्यायालयाने त्यांना २९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भीमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा, अहमदनगर) आणि डॉ. युवराज बब्रुवान भुजबळ (४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत; तर यापूर्वी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख यांना अटक करण्यात आली आहे.
तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी न्यायालयात सांगितले की, भीमाजी साबळे हा अर्थ केम लॅबेरेटरी कंपनीचा मालक आहे. त्याने केमिकल इंजिनिअर आणि पीएच.डी.धारक असलेल्या युवराज भुजबळ याच्या मदतीने एमडीचा फॉर्म्युला आणि कच्चा माल तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून एमडी तयार केले, तसेच ते कुणाला दिले, किती प्रमाणात तयार केले, ड्रग्जनिर्मिती करण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून आणला याबाबत तपास करायचा आहे. तसेच, साबळे आणि भुजबळ यांनी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनची निर्मिती केली असून, साथीदारांमार्फत देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवला आहे. तसेच, हे आरोपी इतर आरोपींच्या संपर्कात कसे आले? याची चौकशी करायची असल्याने पोलिस कोठडीची मागणी केली होती.
बचाव पक्षाच्या वतीने आरोपींना कमीत कमी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना २९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.