Koregaon-Bhima violence : पुणे पोलीस भाजपाला मदत करताहेत : सचिन सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:06 IST2018-11-19T13:04:32+5:302018-11-19T13:06:18+5:30
Koregaon-Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचारात दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न भाजपाला मदत करण्यासाठीच आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला आहे.

Koregaon-Bhima violence : पुणे पोलीस भाजपाला मदत करताहेत : सचिन सावंत
मुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचारातमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मदत करण्यासाठीच आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले की, पुणे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरेगाव-भीमा हिंसाचार संदर्भात सुनावणी करताना पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत?, असा प्रश्न विचारत पुणे पोलिसांचा समाचार घेतला होता. असे असतानाही पुणे पोलिसांचे अधिकारी माध्यमांशी जाणीवपूर्वक संवाद साधत आहेत. त्यांचा या मागचा हेतू हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी हाच आहे, असे दिसून येत आहे. पुणे पोलीस सरकारच्या इशा-यावर चालणारे प्यादे बनले आहेत.
(Koregaon-Bhima Violence : 'तो' मोबाईल नंबर दिग्विजय सिंहांचा; होऊ शकते चौकशी)
एके ठिकाणी जिवंत बॉम्बचा साठा सापडल्या प्रकरणी सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठानच्या लोकांना साधे चौकशीसाठी बोलावले जात नाही. तसेच कोरेगाव-भीमा हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांची साधी चौकशी न करता एल्गार परिषदेचा या हिंसाचाराशी संबंध जोडून त्याची चौकशी केली जात आहे. शहरी नक्षलवाद हा शब्द राजकीय फायद्यासाठी वापरून कट्टरतावाद्यांपासून दुसरीकडे लोकांचे लक्ष वळावे हा सरकार व भाजपाचा प्रयत्न आहे. पुणे पोलीस यात त्यांना मदत करत आहेत. महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा गुजरात मॉडेलनुसार चालवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण गुजरात मॉडेलची कशी वाताहत झाली हे जनतेसमोर आहे. महाराष्ट्र पोलिसांची तशी अवस्था होऊ नये, अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली.