कोरेगाव भीमा दंगल : चौकशी आयोगाचे काम ५ सप्टेंबरपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:24 IST2018-08-20T00:23:47+5:302018-08-20T00:24:35+5:30

आयोगापुढे सुमारे ५०० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार

KOEGAGAON BHIMA TRIBUNE: The inquiry commission will start work on September 5 | कोरेगाव भीमा दंगल : चौकशी आयोगाचे काम ५ सप्टेंबरपासून सुरू होणार

कोरेगाव भीमा दंगल : चौकशी आयोगाचे काम ५ सप्टेंबरपासून सुरू होणार

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या आयोगाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे.एन. पटेल आहेत. पटेल हे कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही होते. तर राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत.
आयोगापुढे सुमारे ५०० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. सुनावणीच्या सुरुवातीलाच एक डझन साक्षीदारांची साक्ष म्हणजेच १२ नोंदविण्यात येईल. आयोगात १०,००० पानी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत, असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरये यांनी सांगितले.
दंगलीचे कारण आणि परिणाम याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. त्याशिवाय १ जानेवारी रोजी पोलिसांनी आणि प्रशासनाने पुरेशी व्यवस्था केली होती का, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. दंगलीच्या घटनाक्रमाप्रमाणेच या दंगलीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची, संस्थेची आणि गटाचीही आयोग चौकशी करणार आहे. तसेच दोन लाख दलित घटनास्थळावर जमा झाले होते तेव्हा त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था कशी होती, याचीही चौकशी केली जाणार आहे.
कोरेगाव भीमा दंगलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, असे आश्वासन देत ९ फेब्रुवारी रोजी चार महिन्यांच्या कालावधीसाठी आयोगाची नियुक्ती केली.
हिरये यांच्या म्हणण्यानुसार, आयोगाने घटनास्थळी भेट दिली असून तेथील फोटो आणि व्हिडीओ घेतले आहेत. त्याशिवाय महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.
आयोगापुढे ५०० प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यात पुणे ग्रामीण पोलीस, काही संस्था व एनजीओंचाही समावेश आहे. तसेच या दंगल प्रकरणाचे मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांनीही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
कोरेगाव भीमा दंगलीनंतर २ जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी मिलिंद एकबोटे व शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा नोंदविला. मिलिंद एकबोटे यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Web Title: KOEGAGAON BHIMA TRIBUNE: The inquiry commission will start work on September 5