किरीट सोमय्या हल्ला प्रकरण! भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 21:40 IST2022-02-07T21:40:02+5:302022-02-07T21:40:09+5:30

किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Kirit Somaiya attack case pune In the future all calculations will be wrong Chandrakant Patil warns Shiv Sena | किरीट सोमय्या हल्ला प्रकरण! भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण! भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

पुणे : किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.‌ पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाटील म्हणाले, "किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणं, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंच सिद्ध होतं. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे."

ते पुढे म्हणाले की, "किरीट सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याही क्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे विडंबन वृत्त सामनामधून प्रकाशित करण्याच्या कृतीवर बोलताना पाटील म्हणाले, "सामना हा सवंग लोकप्रियतेसारखे आता गल्लीतले वृत्तपत्र झाले आहे. त्यामुळे आदरणीय रश्मी वहिनी यांनी सामनाचे संपादक पद सोडलं आहे का?" असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, किरीट सोमय्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला नाही. तर भारतीय जनता पक्ष उच्च न्यायालय आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Kirit Somaiya attack case pune In the future all calculations will be wrong Chandrakant Patil warns Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.