अफेअरच्या संशयाने ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 09:38 IST2023-03-14T09:38:05+5:302023-03-14T09:38:44+5:30
सेनादत्त चौकातून म्हात्रे पुलाकडे जात असताना इर्टिगा गाडीतून ५ ते ६ जण आले...

अफेअरच्या संशयाने ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; नेमकं प्रकरण काय?
पुणे : म्हात्रे पुलाजवळून एका २५ वर्षीय तरुणाचे ५ ते ६ जणांनी अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली. सलग दोन दिवस पोलिस या तरुणाचा शोध घेत होते. पुण्यातून अपहरण केलेल्या या तरुणाला परभणीमध्ये सोडण्यात आले. याबाबत त्याच्या भावाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा तरुण पुण्यात एमपीएससीची तयारी करीत आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ हे जनक अभ्यासिकेतून १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता घरी जात होते. त्यावेळी सेनादत्त चौकातून म्हात्रे पुलाकडे जात असताना इर्टिगा गाडीतून ५ ते ६ जण आले. त्यांनी या तरुणाला पकडून जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले. फिर्यादी यांनी भावाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अपहरणकर्त्यांनी या तरुणाला थेट परभणीला नेले. तेथे त्यांनी त्याला एका तरुणीसमोर उभे करून तिच्याबरोबर तुझे संबंध काय आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी मूळच्या नांदेडच्या या तरुणीने आपले त्याच्यावर प्रेम असल्याचे न घाबरता सांगितले. त्यामुळे त्यांचा नाइलाज झाला. त्यांनी या तरुणाला सोडून दिले. दरम्यान, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.