Pimpri Chinchwad: पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठाचे अपहरण करून खून; दोघांना अटक
By नारायण बडगुजर | Updated: November 2, 2023 16:31 IST2023-11-02T16:30:40+5:302023-11-02T16:31:08+5:30
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, टाकवे आणि चिंचवड येथे मंगळवारी (दि. ३१) हा धक्कादायक प्रकार घडला....

Pimpri Chinchwad: पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठाचे अपहरण करून खून; दोघांना अटक
पिंपरी : पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण केले. त्यानंतर बेल्टने मारहाण करत त्यांचा खून केला. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, टाकवे आणि चिंचवड येथे मंगळवारी (दि. ३१) हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली. आर्थिक कारणावरून खुनाचा हा प्रकार घडला, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
श्रीकृष्ण उद्धवराव टकले (६५) असे मयताचे नाव असून शिवाजी राजाराम गरूड (६५, रा. टाकवे) व अनिल शिवलिंग कोळी (४५, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात किरण शंकर खोल्लम (४८, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत टकले हे फिर्यादी खोल्लम यांचे सासरे आहेत. टकले हे फिर्यादी खोल्लम यांच्या घरी असताना संशयित थेट घरात घुसले व त्यांनी पोलिस असल्याची बतावणी केली. टकले यांना बळजबरी गाडीत बसवून चिंचवड येथे संशयित शिवाजी याच्या मुलीच्या घरी नेले. तिथे पैशांच्या कारणावरून बेल्टने मारहाण केली. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून मावळ तालुक्यातील टाकवे येथे नेले. तेथे मारहाण करून त्यांचा खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
किरण खोल्लम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तळेगाव दाभाडे पोलिसांनी संशयितांना अटक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील तपास करीत आहेत.