पुणे : खडकवासला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीचा बनावट दाखला सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या कारणावरून सरपंच महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हवेली पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. प्रतिभा महेश मते असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. अशोक लक्ष्मण मते (वय ६५, रा. तुकाईनगर, सिहंगड रस्ता) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य निवडणूक आयोगाने २०१२ ते २०१७ कालावधीकरिता खडकवासला ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली होती. या निवडणूकीमध्ये एकूण १५ सदस्य निवडून आले. इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी सरपंचपद राखीव होते. प्रतिभा मते यांनी माहेरच्या नावाने इतर मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले. मागासवर्गीय महिला उमेदवार राखीव पदासाठी प्रचार केला आणि त्या राखीव पदावर निवडणूक जिंकल्या. मात्र ग्रामस्थांनाच त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत शंका आल्याने माहिती अधिकारांतर्गत जात पडताळणी समितीकडून माहिती मागविली असता प्रतिभा मते यांनी इतर मागासवर्गीय जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून निवडणुकीच्या वेळी बनावट प्रमाणपत्र सादर केले. जात पडताळणी समितीने मते यांचा जातीचा दाखला रद्द ठरविला. जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले होते. खोट्या व बनावट जात वैधता प्रमाणपत्रावर शासनाच्या राजचिन्हाच्या शिक्क्याचा वापर केल्याने अशोक मते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सरकार व मतदार यांची फसवणूक करण्यात आली असून तसा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार हवेली पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
खडकवासला सरपंच महिलेवर बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:48 IST
खडकवासला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीचा बनावट दाखला सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या कारणावरून सरपंच महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकवासला सरपंच महिलेवर बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी गुन्हा दाखल
ठळक मुद्देखडकवासला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जातीचा बनावट दाखला सादर करून सरकारची फसवणूकप्रतिभा महेश मते असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच महिलेचे नाव