आळेफाटा : जिओ कंपनी मधून बोलत असल्याचे सांगून जुन्नर तालुक्यातील एका महिलेला सायबर चोरट्यांनी ३ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ७ डिसेंबर दरम्यान बेल्हे, कोंबरवाडी येथे ऑनलाईन घडला आहे. याप्रकरणी बेल्हे, कोंबरवाडी येथील ३९ वर्षीय महिलेने आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जिओ कंपनीतून बोलत असल्याचे एका व्यक्तीने फिर्यादीस फोन केला. तुम्हीं फोन उचलू नका असे बोलल्यामुळे फिर्यादी आणि तिचे पती यांनी फोन कट केला. त्यानंतर मोबाईल वर ४-५ मेसेज आले. मोबाईलची रेंज गेली व फोन येणे जाणे बंद झाले. फिर्यादीचे पतीने जिओ कंपनीचे गॅलरीमधे जाऊन मोबाइलचे सिमकार्ड बंद पडले असलेबाबत चौकशी केली असता तेथील जिओ कंपनीचे कर्मचारी यांनी मोबाईलचे सिमकार्ड खराब झालेले असल्याचे सांगितले. त्यानंतर जिओ कंपनीचे कर्मचारी यांनी नवीन सिमकार्ड दिले. दि. १४ डिसेंबर रोजी फिर्यादीचे पतीचे मोबाईलवर २५०० रुपये शिल्लक असलेचा बँकेचा मेसेज आला. १६ डिसेंबर रोजी त्यांनी बेल्हे येथिल बँकेत जाऊन चौकशी केली असता अकाऊंट मधून ३ लाख २८ हजार रूपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीचे पतीच्या लक्षात आले. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास आळेफाटा पोलीस करत आहे.