पुणे : तुम्हाला माहितीये का? चोऱ्या वाढल्यात, दागिने काढून ठेवा असे सांगून चोरट्यांनी महिलेला अंगावरील दागिने रुमालात बांधून दिले. मात्र, सोसायटीत शिरल्यावर रुमाल उघडून पाहताच दागिन्यांऐवजी दगड निघाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला एक लाख ६० हजारांच्या दागिन्यांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत विमाननगर येथील एका ६४ वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली. ही घटना विमाननगरमधील शुभ गेट वे सोसायटीच्या बाहेरील फूटपाथवर रविवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरायला गेल्या होत्या. फिरायला जाऊन परत सोसायटीच्या गेटजवळ येत असताना तिघेजण चालत त्यांच्याजवळ आले. तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून ठेवा, असे म्हटल्यावर त्यांनी ठीक आहे, मी दागिने काढून ठेवते, असे म्हणून पुढे चालू लागल्या. तरी त्यांनी परत आवाज दिला. मावशी तुम्हाला माहिती आहे, चोरी होत आहे. आपले दागिने माझ्याकडे द्या, असे सांगून त्यांच्याकडील रुमालामध्ये दागिने ठेवण्यास सांगितले. त्यांनी अंगावरील एक लाख ६० हजार रुपयांचे चार तोळ्याचे मंगळसूत्र काढून रुमालात ठेवले. त्याने रुमालात बांधल्याचे सांगून तो रुमाल त्यांच्या हातामध्ये दिला. रुमाल घेऊन त्या सोसायटीच्या गेटच्या आतील बाजूस आल्यानंतर त्यांनी रुमाल उघडून पाहिले तर त्यात दागिन्याऐवजी दगड असल्याचे आढळून आले. सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.