भरदिवसा चांदीचे दागिने लुटणारे जेरबंद
By Admin | Updated: February 16, 2016 01:33 IST2016-02-16T01:33:41+5:302016-02-16T01:33:41+5:30
भरदिवसा दोन पिस्तुलाचा धाक दाखवून चांदीचे दागिने लुटणाऱ्या चौघांना जेरबंद करण्यात मंचर पोलिसांना यश आले. या टोळीचा म्होरक्या शहरातील एक

भरदिवसा चांदीचे दागिने लुटणारे जेरबंद
मंंचर : भरदिवसा दोन पिस्तुलाचा धाक दाखवून चांदीचे दागिने लुटणाऱ्या चौघांना जेरबंद करण्यात मंचर पोलिसांना यश आले. या टोळीचा म्होरक्या शहरातील एक सोने-चांदीचा दुकानदार निघाला असून मुंबईमधील दोन शार्पशूटर सहभागी झाले होते. चांदीचे दागिने व एक पिस्तुल, मोटारसायकल गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. अवघ्या एका दिवसात पोलिसांनी तपास लावला. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
मुख्य आरोपी अनिल सुभराव शिंदे (वय २९) मयूर भरत विभूते (वय २४, दोघे रा. आटपाडी, ता. व जि. सांगली) शार्पशूटर वैभव दशरथ पिंगट (वय २१), अनिकेत लक्ष्मण अमराळे (वय २४, दोघे रा. भांडुप, मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनिल शिंदे यांनी गणेश बांगर यांच्यासोबत मंचर शहरात श्रेया ज्वेलर्स सोन्या-चांदीचे दुकान सुरू केले. बांगर साडेतीन महिन्यांपासून बाहेरगावी होते. कर्जबाजारी झाल्याने अनिल शिंदे याने चोरीचा प्लॅन आखला. अनिलने मयूर विभूते याला दुकानात कामाला ठेवले होते, तसेच मुंबईतील शार्पशूटर वैभव पिंगट व अनिकेत अमराळे यांना पिस्तुलांसह बोलावून घेतले. सुखदेव सावंत सकाळी दागिने घेऊन येतात, हे माहीत असल्याने पाळत ठेवून हा प्रकार करण्यात आला.
मंचर बसस्थानकावर पिंगट व अमराळे आल्यावर मयूर विभूते यांनी त्यांना मोटारसायकलवरून संभाजी चौकात सोडले. (एमएच १४ डीपी ५४५९) या पल्सरवरून विभूते दुकानाकडे पाहणी करीत गेला. सावंत दुकानात आल्याचे पाहून विभूते याने दोघा शार्पशूटरना डोळ््याचा इशारा देऊन तो शिवाजी चौकात जाऊन उभा राहिला. वैभव पिंगट व अनिकेत अमराळे संभाजी चौकमार्गे बाजारपेठेतून पायी जात त्यांनी सुखदेव सावंत यांच्यावर पिस्तुल रोखले. पिस्तुलानेच मारहाण करून त्यांना जखमी केले. चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन दोघे पळत शिवाजी चौकात आले. वेशीजवळ स्थानिक तरुण अनिकेत सोमवंशी याने दोघांना हटकलेही. दोघे चोरटे पळत जाऊन मयूर विभूते याच्या मोटारसायकलवर बसले व त्यांनी धूम ठोकली व त्या वेळी सोमवंशी व जीतू बाणखेले यांनी त्यांचा पाठलाग केला.
पुणे-नाशिक महामार्गावर पारगाव फाटा येथे मुख्य सूत्रधार अनिल शिंदे चारचाकी गाडी घेऊन आला. तेथे वैभव पिंगट, अनिकेत अमराळे या दोघा शार्पशूटरना व दागिने घेऊन ते सांगली व तेथून मुंबईला गेले. विभूते दुचाकी घेऊन माघारी आला. शहरातील दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत चोरटे दिसून आले. शिवाय अनिकेत सोमवंशी याने मोटारसायकलचा नंबर टिपल्याने पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे आले. नंबरबद्दल आरटीओकडे चौकशी केली असता सांगली, पिंपळगाव व पुणे येथील ६ गाड्या निष्पन्न झाल्या. त्यातील गणेश बांगर यांच गाडीवरून माग निघाला. बांगरची गाडी मयूर विभूते वापरत होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी रात्रीचा सापळा रचून विभूते याला दुचाकीसह जेरबंद केले. त्याने इतरांची नावे सांगितली. (प्रतिनिधी)