Jejuri Nagar Parishad Election Result 2025 : जेजुरीत एकतर्फी विजयासह अजित पवारांचाच भंडारा, भाजपला अवघ्या दोन जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:05 IST2025-12-21T17:03:39+5:302025-12-21T17:05:37+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस चे जयदीप बारभाई मोठ्या मताधिक्याने विजयी

Jejuri Nagar Parishad Election Result 2025 : जेजुरीत एकतर्फी विजयासह अजित पवारांचाच भंडारा, भाजपला अवघ्या दोन जागा
जेजुरी - तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ने एकतर्फी विजय मिळवत भंडारा उधळला असून जेजुरीकरांनी भाजपला नाकारले. भाजपाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने २० पैकी १७ जागा जिंकल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई हे विजयी झाले आहेत. त्यांनी मागील पराभवाची या निवडणुकीत परतफेड केली. भाजप चे सचिन सोनवणे यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. बारभाई यांना ७३०४ मते मिळाली तर सोनवणे यांना३७८९ मते मिळाली. निवडणुकीत शिंदे सेनेला एकही जागा मिळाली नाही. सेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिनेश सोनवणे यांना ११६५ मते मिळाली.
आज जेजुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येथील मल्हार नाट्यगृहात सकाळी दहा वाजता मतमोजानीला सुरुवात झाली. दहा टेबल आणि दोन फेऱ्यात संपूर्ण मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारासह २० पैकी १७ उमेदवार आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत ही त्यांची आघाडी वाढत गेली. अंतिम निकाल हाती आला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नगराध्यक्षासह १७ उमेदवार विजयी झाले. भाजप ला प्रभाग ८ मधील केवळ दोन जागा तर प्रभाग ३ मध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
नगराध्यक्ष पद - जयदीप दिलीप बारभाई
प्रभाग क्र. १ भक्ती वैभव कोरपड, योगेश रोहिदास जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्र.२ प्रज्ञा पंकज राऊत स्वप्नील सुरेश हरपळे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्र.३ अमीना मेहबूब पाणसरे, (राष्ट्रवादी काँग्रेस), तानाजी खोमणे (अपक्ष )
प्रभाग क्र.४ स्नेहल गौतम भालेराव, मेघा सत्यवान उबाळे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्र. ५ - स्वरूपा जालिंदर खोमणे, कृष्णा रुपचंद कुदळे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्र. ६ नीलम सुधीर सातभाई, गणेश मच्छिन्द्रनाथ निकुडे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्र.७ मोनिका राहुल घाडगे, अस्लम फकीरभाई पानसरे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभाग क्र.८ प्रियंका अजिंक्य देशमुख, गणेश चंद्रकांत डोंबे (भाजपा )
प्रभाग क्र.९ मंदा रमेश बयास, रोहित अशोक खोमणे (राष्ट्रवादी काँग्रेस )
प्रभागक्र. १० योगीता देवेंद्र दोडके, शिवाजी दत्तात्रय जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस )
गेल्या निवडणुकीत भाजप हा पक्ष निवडणुकीत कुठे दिसलाच नाही. नव्याने काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश करणारे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस च्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासह १७ पैकी ११जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या पराभवाची परतफेड केली. माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांना ही पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मात्र जेजुरी करांनी भाजपला पूर्णपणे नाकारले आहे.