Jejuri Nagar Parishad Election Result 2025 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:37 IST2025-12-21T11:37:23+5:302025-12-21T11:37:59+5:30
Jejuri Local Body Election Result 2025 : जेजुरी नगरपरिषद निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार १७ ठिकाणी आघाडीवर आहे.

Jejuri Nagar Parishad Election Result 2025 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी
पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी निवडणूक रिंगणात महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले होते. त्यामुळे दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. मात्र, आता या कुस्तीचा आज निकाल लागणार आहे. आतापर्यंत विजय आमचाच म्हणणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. कोण कोणाला चितपट करणार आणि कोण किती पाण्यात आहे याचाही फैसला आहे.
दरम्यान, जेजुरी नगरपरिषद निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार १७ ठिकाणी आघाडीवर आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप दिलीप बारभाई हे भाजपचे उमेदवार सचिन सोनवणे यांच्यापेक्षा मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. जेजुरी नगरपालिकेची मतमोजणी दहा टेबलांवर आणि दोन फेऱ्यांत होणार असून, तासाभरात संपूर्ण निकाल येईल, अशी माहिती जेजुरी नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे यांनी दिली आहे.
जेजुरी नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत दि. २ डिसेंबर रोजी १५,८०० मतदारांपैकी १२,३३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुमारे ७८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या एकूण ५० उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. पालिकेच्या एकूण २० जागांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात सरळ लढत झाली. दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह प्रत्येकी २१ उमेदवार रिंगणात होते. या खालोखाल शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासह तीन, उबाठा गट दोन आणि काँग्रेस व अपक्ष एक असे उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
येत्या रविवारी दि. २१ रोजी येथील मल्हार नाट्य गृह येथे सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. यासाठी दहा टेबल मांडण्यात आले आहेत. पहिल्या फेरीत प्रत्येक टेबलावर प्रत्येक प्रभागाच्या दोन मतपेट्यापैकी एका मतपेटीची मोजणी होणार आहे. दुसऱ्या मतपेटीची मोजणी होणार आहे. संपूर्ण मतमोजणी दोन फेऱ्यांत पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलावर नगराध्यक्ष पदाचा एक आणि नगरसेवक पदाचा प्रत्येकी एक असे प्रतिनिधी राहू शकतात. याशिवाय संपूर्ण निकाल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
मतमोजणीच्या वेळी एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक आणि १०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. निकालानंतर कोणालाही मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. किंवा परवानगी दिली जाणार नसल्याचे जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे यांनी सांगितले. यावेळी जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सहायक निवडणूक अधिकारी चेतन कोंडे हेही उपस्थित होते.