जेजुरीत भरला गाढवांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:16+5:302021-02-05T05:09:16+5:30

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौषपौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात ...

Jeju filled the donkey market | जेजुरीत भरला गाढवांचा बाजार

जेजुरीत भरला गाढवांचा बाजार

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौषपौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी -विक्री होत असली तरी ही गाढवांची संख्या कमी होती. केवळ ५०० गावठी व काठेवाडी जातीच्या गाढवांची खरेदी विक्री झाली. जनावरे कमी आणि व्यापारी जास्त यामुळे जनावरांना मोठी मागणी राहिल्याने चढया भावात विक्री होत होती. यामुळे लाखोची बाजाराची उलाढाल झाली.

जेजुरीत भरणारी पौषपौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी -विक्री) पुरातन काळापासून प्रसिध्द आहे. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षापासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी -विक्री करतात. या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात कर्नाटक, आंध्र या राज्यासह महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवासह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी -विक्री बरोबरच देवदर्शन -कुलधर्म -कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.

पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असल्याने गाढवांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. यंदा केवळ ५०० विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषतः राजस्थानी-काठेवाडी जातीची ७५ जनावरे होती. या गाढवाला सर्वात जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर गावरान-गावठी गाढवाला १० ते २५ हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी-काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक -आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते. पूर्वीच्या काळी गारुडी ,कुंभार,परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत असे आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी-विक्री करताना दिसतात. गाढवांच्या दातावरून त्याचे वयाचे अनुमान काढले जाते.

दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात. रंगावरूनही किमत करण्यात येते. पांढऱ्या शुभ्र जनावराला चांगला दर मिळतो. त्यानंतर गडद जांभळा, तपकिरी लालसर, करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाऱ्या यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखोरुपयांची उलाढाल होत असे परंतु सध्या परिस्थिती तशी राहिली नाही. केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करावयाची असे काही समाजबांधवांनी सांगितले. मात्र, आजच्या यांत्रिक युगात, औद्योगिकरणामुले गाढवांचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची संख्या ही कमी होत आहे. गेल्या वर्षी एक हजार गाढवांची संख्या होती. यावर्षी ही संख्या निमम्याने कमी झाली आहे.

फोटो ओळी -

जेजुरी येथील गडाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा भरलेला बाजार -दाखल झालेली विविध जातींची गाढवे

Web Title: Jeju filled the donkey market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.