"जसं काय समाजात शिव्या दिल्याच जात नाहीत", OTT बाबत जावेद अख्तर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 05:00 PM2022-03-04T17:00:47+5:302022-03-04T17:01:08+5:30

ओटीटी खूप सशक्त माध्यम असून बोल्ड विषय चित्रपटात येऊ शकत नाहीत ते ओटीटीवर येऊ शकतात.

Javed Akhtar has clearly spoken about OTT | "जसं काय समाजात शिव्या दिल्याच जात नाहीत", OTT बाबत जावेद अख्तर स्पष्टच बोलले

"जसं काय समाजात शिव्या दिल्याच जात नाहीत", OTT बाबत जावेद अख्तर स्पष्टच बोलले

googlenewsNext

पुणे : ’ओटीटी’ खूप सशक्त माध्यम आहे. जे बोल्ड विषय चित्रपटात येऊ शकत नाहीत ते ओटीटीवर येऊ शकतात. भाषेमध्ये शिव्यांचा भडिमार असला तरी हे माध्यम येण्यापूर्वी शिव्या दिल्याच जात नव्हत्या का?  समाजातही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना आपल्या कानावर एकही शिवी पडत नाही का? समाजात शिव्या दिल्याच जात नाहीत असं तर होत नाही ना? मी त्याचे समर्थन करीत नाही आणि स्वत:ही कधी शिव्या देत नाही. पण चांगला विषय असेल तर काही वेळा चालवून घ्यायचे किंवा दुर्लक्ष करायचे...असे स्पष्ट मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

20 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

 भाषेपासून माणूस तुटला तर तो संस्कृतीपासून दुरावला जाईल

आज समाजाची भाषा बदलत चालली आहे का? शिव्या हीच भाषा होत चालली आहे का? ओटीटीवर दाखविणा-या वेबसिरीजमधील हिंसा, शिव्यांमुळे त्याला खतपाणी मिळतयं का? याविषयी भाष्य करताना शिव्या देणे ही चांगली गोष्ट नाही. ज्यांच्याकडे भाषा नाही ते शिव्या घालतात. शिवी म्हणजे संपूर्ण जेवणात मिर्ची घालण्यासारखे असते. जर चांगला शब्दसंग्रह असेल तर शिव्यांची गरज भासणार नाही याकडे अख्तर यांनी लक्ष वेधले. तसेच आपण जीवनात कधी कला संस्कृती, संगीत याला महत्वच दिलेलं नाही. आपल्या प्राधान्यक्रमामध्ये या गोष्टी नाहीत. मुलांना कला, संगीताविषयी पालक  प्रोत्साहित करताना दिसत नाहीत.  आपण मुलांना भाषा देण्यात कमी पडलो आहोत.  आज इंग्रजीशिवाय व्यवहार होत नाही. मुलांना इंग्रजी यायला हवी. पण त्यासाठी किती किंमत मोजणार? प्रत्येक मुलाला मातृभाषा मग ती मराठी, हिंदी,  गुजराती, कन्नड असो ती यायलाच हवी. कारण भाषेवरच संस्कृती तग धरून असते. भाषेपासून माणूस तुटला तर तो संस्कृतीपासून दुरावला जाईल असेही ते म्हणाले.

Web Title: Javed Akhtar has clearly spoken about OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.