आळंदी : मराठा समाज आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहे. आझाद मैदानावर हा मोर्चा जाणार असून पहिल्या मोर्चाच्या तुलनेत पाचपटीने अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होणार आहे. मात्र यावेळी मराठा आरक्षण भेटल्याशिवाय ''मुंबई सोडणार नाही'' असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. खेड तालुक्यातील चिंबळी येथे आयोजित बैठकीत जरांगे पाटील बोलत होते. याप्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या मोर्च्याची रणनीती ठरविण्यात आली. मागील वेळी मराठा समाजाचा मोर्चा लोणावळा मार्गे मुंबईला नेण्यात आला होता. परंतु यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे कल्याण - ठाणे चेंबुरवरुन आझाद मैदानावर जाईल. मागील आंदोलनवेळी मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत मराठा समाज आरक्षणावर तोडगा निघाला नाही. आता आम्ही कुणाच्याही सांगण्यावरुन थांबणार नाही असेही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले.
माळशेज घाटातुन खाली उतरल्यावर मराठा समाजाचा हा मोर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातुन जाणार आहे. याबाबत विचारलं असता जरांगेंनी आम्ही निस्वार्थी भावनेने पुढे जातोय कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला असल्याचे सांगितले. त्यातच मराठा आणि धनगर वेगळा नसुन एकच असल्याने त्या समाजानेही जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या आगामी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
दोन भावांनी एकत्र यावं...
दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे कि "मुंबई पाहिजे तर ठाकरे पाहिजे". कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं. पण कशासाठी म्हणत होते हे माहिती नाही असा टोला त्यांनी लागवला. दरम्यान राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत. मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा...
संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. मला मिळालेली माहिती खरी असुन असले चाळे बंद करा. प्रमाणपत्र रोखुन धरु नका. अन्यथा वेळ वाईट येईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे.