ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:26 IST2025-12-20T13:24:46+5:302025-12-20T13:26:37+5:30
Sanjog Waghere BJP: ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंनी महापालिका निवडणूक जाहीर होताच मोठा निर्णय घेतला.

ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
महापालिका निवडणूक जाहीर पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महत्त्वाचे नेते संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. वाघेरेंनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वाघेरे भाजपच्या वाटेवर असून, लवकरच त्यांचा प्रवेश होणार आहे.
संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मावळ मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. सध्या ठाकरे गटाकडून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्याची जबाबदारी संजोग वाघेरे यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली होती. पण, त्यांनीच पक्ष सोडला आहे.
अजित पवारांचे निष्ठावंत, ठाकरेंकडून लोकसभा लढवली
अजित पवारांचे निष्ठावंत असलेले संजोग वाघेरे लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते. विधानसभा निवडणुकीपासूनच ते पक्षांतर करण्याच्या चर्चा होती. पण, आता त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
संजोग वाघेरे यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी उषा वाघेरे, ज्या सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्या आणि इतरही पदाथिकारी प्रवेश करणार आहेत. उषा वाघेरे प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
संजोग वाघेरे ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर वाघेरे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकून लोकसभेला उमेदवारी दिली. त्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. येत्या काळामध्ये पिंपरी चिंचवडची वाढती लोकसंख्या आणि विकासाला चालना देण्यासाठी भाजपसोबत जात आहे."
"केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विकासाचे प्रश्न सोडवणे सोपे जाईल. माझ्यासोबत काही नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत. तेही आज प्रवेश करणार आहे. प्रवेश झाल्यानंतर माजी नगरसेवकांची नावे तुम्हाला कळतील. महापालिकेसाठी माझी पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात आहे", असे वाघेरे यांनी सांगितले.