जय हरी विठ्ठल! आषाढी वारी सोहळ्याची मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:01 PM2021-08-03T23:01:38+5:302021-08-03T23:02:15+5:30

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत माऊलींच्या चलपादुका मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या संजीवन समाधीवर विराजमान करून मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या १९० व्या आषाढी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

Jai Hari Vitthal Pandharpur Wari ceremony is celebrated with great enthusiasm | जय हरी विठ्ठल! आषाढी वारी सोहळ्याची मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता

जय हरी विठ्ठल! आषाढी वारी सोहळ्याची मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता

Next

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत माऊलींच्या चलपादुका मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या संजीवन समाधीवर विराजमान करून मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या १९० व्या आषाढी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.  कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत निवडक संबंधित वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 

यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे माऊलींची आषाढी वारी निवडक चाळीस वारकऱ्यांसह माऊलींच्या चलपादुका घेऊन बसद्वारे पंढरीला गेली होती. चालू वर्षी माऊलींचा सोहळा ३२ दिवसांऐवजी पौर्णिमेनंतर काल्याचा कार्यक्रम करून पंढरीहून स्वगृही परतला होता. त्यानंतर आळंदीत दाखल झालेल्या माऊलींच्या चलपादुकांना कारंज्या मंडपात विराजमान करून त्या ठिकाणी पादुकांना दैनंदिन नित्योपचार करण्यात आले आहेत.

तत्पूर्वी मंगळवारी (दि.०३) विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पादुकांना पवमान अभिषेक, दुधारती व महापुजा संपन्न झाली. सायंकाळी वीणामंडपात चक्रांकित महाराजांच्या वतीने नियमित सुरू असलेली ह.भ.प. जगदीशशास्त्री जोशी यांची कीर्तन सेवा पार पडली. प्रथेप्रमाणे चोपदारांनी देव आल्याची वर्दी दिल्यानंतर चक्रांकित महाराजांची दिंडी देवाला सामोरे गेली. टाळ - मृदुंगाच्या निनादात तसेच 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून वीणामंडपमार्गे कारंज्या मंडपातून माऊलींच्या चलपादुका गाभाऱ्यात नेण्यात आल्या. 

 "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय" असा जयजयकार करत पादुकांना माऊलींच्या संजीवन समाधीसमोर विराजमान करण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार माऊलींना पिठलं - भाकरीचा महानैवेद्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानतर्फे श्री. चक्रांकित महाराज यांनी अर्पण केला. विधिवत आरती घेऊन आषाढी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

 याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे - पाटील, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, ह.भ.प. चक्रांकित महाराज, चैतन्य महाराज कबीरबुवा, योगीराज कुऱ्हाडे, माऊली गुळुंजकर,
व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह अन्य निवडक वारकरी उपस्थित होते. 

बुधवारी (दि.०४) कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या संजीवन समाधीला पहाटे पवमान अभिषेक, दुधारती व महापुजा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंढरीच्या आषाढी एकादशीनंतर असलेल्या कामिका एकादशीनिमित्त हजारो वारकरी अलंकापुरीत माऊलींच्या दर्शनाला येतात. मात्र सध्या शासनाच्या आदेशानुसार भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी भाविकांनी दर्शनाला येऊ नये असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Jai Hari Vitthal Pandharpur Wari ceremony is celebrated with great enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app