पुणे : भारत - पाकिस्तानची झालेली मॅच फिक्स होती, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, ‘माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत. पत्रकार परिषद घेऊन हे आरोप करणारे, त्यात संजय राऊत यांच्यासह, त्यांच्या घरात भारत - पाकिस्तानची मॅच पाहत होते. जेव्हा भारत जिंकला, तेव्हा त्यांना दुःख होत होते. कारण पाकिस्तान जिंकला असता, तर त्यांनी त्यावर अजूनही राजकारण केले असते, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
प्रताप सरनाईक म्हणाले, संजय राऊत यांनी निदान राष्ट्रीय संघ खेळत असताना, आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानचा वारंवार पराभव केला असताना, भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी त्यात राजकारण करणे चुकीचे आहे. ज्या-ज्या लोकांनी विरोध केला, त्यांच्या प्रत्येकाच्या घरात मॅच चालू होती, असे आमच्याकडे आलेल्या व्हिडिओंमधून स्पष्ट होते. या बाबीचे राजकारण आम्हाला करायचे नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी चर्चा असल्याबाबत विचारले असता, सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘फेविकॉलचा जोड’ आहेत. हे राज्याच्या विकासासाठी महायुतीची स्थापना करणारे ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत. त्यामुळे कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. पुढील पाच वर्षे हे सरकार व्यवस्थित काम करेल, असेही ते म्हणाले.