Operation Ajay| युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी
By नितीन चौधरी | Updated: October 17, 2023 18:04 IST2023-10-17T18:02:53+5:302023-10-17T18:04:13+5:30
तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे...

Operation Ajay| युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी
पुणे : इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे तेथे अडकलेल्या सुमारे बाराशे भारतीयांना आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुरक्षितपणे देशात आणण्यात आले आहे. तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.
इस्त्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीयांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘इस्त्रायलमध्ये सध्या राहत असलेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. तेथील युद्धजन्य परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुमारे एक हजार ते बाराशे भारतीय नागरिकांना विमानाद्वारे भारतात सुखरूप आणण्यात आले आहे.’
इस्त्रायलमधून ज्या नागरिकांना भारतात येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केले असून त्याची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.