Sinhagad Fort: सिंहगडाच्या घाट रस्त्यावर लोखंडी जाळी बसवली जाणार
By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: October 6, 2022 15:44 IST2022-10-06T15:43:41+5:302022-10-06T15:44:08+5:30
पावसाळ्यानंतर काम होणार...

Sinhagad Fort: सिंहगडाच्या घाट रस्त्यावर लोखंडी जाळी बसवली जाणार
पुणे : किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्यांवर दरड कोसळून काही अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षक लोखंडी जाळी लावण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाने दीड कोटी रूपयांचा निधी सार्वजनिब बांधकाम खात्याला दिला आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेच हे काम सुरू करण्यात येणार आहे
घाट रस्त्याने किल्ले सिंहगडावर जाताना अचानक दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेकदा रस्ता बंद होऊन वाहतूक कोंडी होते. तसेच कोणी दुचाकीस्वार किंवा चार चाकी घाट रस्त्याने जात असेल तर त्यांच्यावरही ही दरड कोसळू शकते. त्यामुळे ही गोष्ट विचारात घेऊन वन विभागाने तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याला संपूर्ण घाट रस्त्याला लोखंडी संरक्षक जाळी लावावी, अशी विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी निधीही दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने यासाठी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली असून, चार ठिकाणी संरक्षक कठडे उभा केले आहेत. इतर संपूर्ण रस्त्यावर लवकरच काम सुरू होणार आहे. आता पावसाळा असल्याने ते काम करता येत नाही. म्हणून पावसाळ्यानंतर काम सुरू होण्याची शक्यता आहे. घाट रस्त्यात कुठे धोकादायक वळण आहे, त्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. रस्त्याच्या कडेला वाहने थांबवू नयेत, असे वन विभागातर्फे सर्वांना सांगण्यात येते.
सिंहगड घाट रस्त्याने जाताना कोणालाही इजा होऊ नये म्हणून लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याची आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती केली आहे. त्यासाठी त्यांना निधी देखील दिला आहे. काम सुरू करण्याविषयी बांधकाम विभाग कार्यवाही करणार आहे.
- प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग
घाट रस्त्यावर संरक्षक जाळी बसविणार आहेत, ती चांगली गोष्ट आहे. पण दर शनिवार-रविवार सिंहगडावर जाताना घाट रस्त्यावर प्रचंड गर्दी होते. त्यावर योग्य उपाय करावा. वाहतूक नियोजन करणारे कर्मचारी नियुक्ती करणे आवश्यक आहे. सिंहगडावर जाण्यासाठी प्रवेश शुल्क घेण्यात येतो. तो लाखो रूपये असतो. त्यातून योग्य त्या सुविधा दिल्या पाहिजेत.
- रोहन कुलकर्णी, सिंहगडावर नियमित जाणारा तरूण