शेतकरी आत्महत्येवर ‘इरमा’चा डोस

By Admin | Updated: April 28, 2017 06:02 IST2017-04-28T06:02:58+5:302017-04-28T06:02:58+5:30

कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव

Irda's Dose on Farmer's Suicide | शेतकरी आत्महत्येवर ‘इरमा’चा डोस

शेतकरी आत्महत्येवर ‘इरमा’चा डोस

पुणे : कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती आणि सर्व प्रकारच्या संकटातून संरक्षण देणारा इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू केल्यास मी गॅरंटीने सांगतो राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
मुळीक यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांची ग्रंथतुला करून आणि शिंदेशाही पगडी, ७५ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. त्यांची पत्नी शालिनी यांचाही साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी त्यांनी शेतीच्या स्थितीवर आणि सरकारी धोरणांवर परखड टिप्पणी केली. पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आमदार जगदीश मुळीक, उल्हास पाटील, पाशा पटेल, मोहन जोशी, उल्हास पवार, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, उत्तमराव शिंदे-सरकार या वेळी उपस्थित होते.
डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘सरकारने सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे. तशी घोषणा करण्याचे धाडस सरकारने दाखविले पाहिजे. शेतमालाला भाव नाही आणि शेतीला धोरणाप्रमाणे कर्ज वितरण नाही, असे दुष्टचक्र आहे. कायद्यानेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला असता, तर आज तुरीचा प्रश्न उपस्थित राहिला नसता.’’ शेतकऱ्यांना नैसर्गिक, कृत्रिम अशा सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण दिल्यास कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यासाठी मी इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू करण्याचा आग्रह सरकारकडे धरीत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Irda's Dose on Farmer's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.