अवैध धंद्यांना बारामतीत ऊत
By Admin | Updated: October 26, 2015 01:55 IST2015-10-26T01:55:20+5:302015-10-26T01:55:20+5:30
बेरोजगारीमुळे बारामतीत अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत. शहरात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला असून, यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे

अवैध धंद्यांना बारामतीत ऊत
बारामती : बेरोजगारीमुळे बारामतीत अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत. शहरात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला असून, यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. झटपट पैसा मिळविण्याचा व्यवसाय म्हणून शहराच्या झोपडपट्टी भागात दारूच्या भट्ट्या पेटतात. सणवार, जयंती उत्सवाच्या वेळी या अवैध दारूविक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते. त्यामुळे त्यांनादेखील पोलिसांच्या कारवाईची भीती नाही.
बारामती शहरासह अगदी फलटण आणि इतर भागांत बारामतीतून तयार होणारी गावठी दारू विक्रीसाठी पुरविली जाते. पाटस मार्गालगतच्या १३ मोऱ्या, मळद पुलाजवळ त्याच्याबरोबर प्रतिभानगर भागात दारू बनविण्याच्या भट्ट्या पेटतात. भर वस्त्यांमध्ये या दारूच्या भट्ट्या असतानादेखील पोलिसांकडून कधीतरी, केव्हातरी कारवाई होते. आरोपींवर किरकोळ कारवाई करून सोडून दिले जाते. वास्तविक टाकाऊ पदार्थांपासून रासायनिक विषच तयार केले जाते. त्यानुसार बनविणाऱ्यांना आणि विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, या अवैध दारू विक्रीला पोलिसांकडून प्रोत्साहन दिले जाते, असे परिसरातील तरुणांकडून सांगितले जाते.
दारूविक्री व्यवसायामुळे सामाजिक स्वास्थ्यदेखील धोक्यात आले आहे. त्याचबरोबर अनेकांचे बळी दारूच्या व्यसनात गेले आहेत. कष्टकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारू बनविण्याच्या भट्ट्याच पेटत असल्यामुळे परिसरातील वातावरणदेखील दूषित होते. बारामती शहरातील अण्णा भाऊ साठेनगर, प्रतिभानगर, फुलेनगरसह आमराईतील अनेक भागांत अवैध दारूधंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. पोलिसांना या सर्वाची माहिती असूनही ठोस कारवाई होत नाही.
सावकारांमुळे घरेदारे सोडण्याची वेळ..
शहरात खासगी सावकारांचे पेव मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. सध्या आर्थिक मंदी असल्यामुळे जादा व्याजदराने घेतलेले खासगी सावकारांचे कर्ज फेडता येत नाही. त्यामुळे अनेकांना घरदार सोडण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये नामांकित डॉक्टरांचादेखील समावेश आहे. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांची उठबस पोलीस अधिकाऱ्यांबरोबर असते. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्यांवर पोलीस अधिकाऱ्यांशी आपले सख्खे आहे, असे भासवले जाते. शहरातील खासगी सावकारकी कर्जदारांच्या मुळावर उठली आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात दररोज किमान ३ ते ४ तक्रारी येतात, असे खुद्द पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्पष्ट केले .