बारामतीच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’चा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:23 IST2018-07-02T18:18:34+5:302018-07-02T18:23:00+5:30
स्पर्धेच्या अंतिम क्षणी क्रिकेटच्या विश्वचषक मॅचप्रमाणे बारामतीकरांची उत्कंठा ताणली गेली होती. विजयी झाल्यानंतर सतीशच्या हातातील भारतीय तिरंगा ध्वज पाहून सर्वजण रोमांचित झाले.

बारामतीच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’चा किताब
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील आॅस्ट्रिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा बहुमान सतीश रामचंद्र ननवरे या युवकाने पटकाविला. ही स्पर्धा जगात नामांकित मानली जाते. रविवारी (दि. १) सतीश याने १२ तास ३३ मिनिटे, ४५ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.
या स्पर्धेमध्ये ३.८०० किमी पोहणे, ४२ किमी धावणे, १८० किमी सायकल चालविणे अशा तीन खडतर आव्हानांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ६.४५ पासून जलतरणपासून स्पर्धेला ऱ्या सुरुवात झाली. त्यानंतर १२ तास ३३ मिनिटे ४५ सेकंदात सतीशने ध्येय गाठले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळाल्याने देशाची मान उंचावली आहे; तसेच बारामतीच्या नावलौकिकात भर पडली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून प्रथमच बारामतीमधून सतीश याने या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पधेर्साठी गेल्या वर्षभरापासून त्याची तयारी सुरू होती. दरम्यान, काल रात्री सतीश याने मिळविलेल्या यशाची माहिती बारामतीकरांना समजली. त्यानंतर शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश खेचून आणणाऱ्या सतीशवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी त्याने मिळविलेले हे यश सोशल मीडियावर सतत दंग असणाऱ्या तरुणाईला आत्मपरीक्षण करायला लावणारे असेच आहे.
आॅस्ट्रिया येथील स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कसबा येथे लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनसमोर बारामतीकरांनी गर्दी केली होती. स्पर्धेच्या अंतिम क्षणी क्रिकेटच्या विश्वचषक मॅचप्रमाणे बारामतीकरांची उत्कंठा ताणली गेली होती. विजयी झाल्यानंतर सतीशच्या हातातील भारतीय तिरंगा ध्वज पाहून सर्वजण रोमांचित झाले. भारतमाता की जय... घोषणा देऊन फटाक्यांची आताषबाजी यावेळी करण्यात आली.
सतीश येथील बारामती क्लबचा सदस्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील सायकल क्लब आरोग्यदायी जीवनासाठी जनजागृती करीत आहे. सतीश यास शुभेच्छा देण्यासाठी बारामती सायकल क्लबच्या सदस्यांनी नुकतीच सायकलवरून अष्टविनायक यात्रा पूर्ण केली.
आॅस्ट्रिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा बहुमान पटकाविल्यानंतर मित्रांनी सतीश ननवरे यास खांद्यावर घेतले. या वेळी सतीश याने भारत देशाचा तिरंगा ध्वज फडकावून विजयाचा आनंद व्यक्त केला.