पुणे : जिल्हा परिषद शाळेच्या एकाच आवारातील मुले व मुलींच्या वेगवेगळ्या भरत असलेल्या तीन शाळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील खडकाळे, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे आणि खेड तालुक्यातील तिन्हेवाडी शाळांचा समावेश असून, राज्य सरकारच्या धोरणानुसारच या शाळांचे एकत्रीकरण करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. खेड तालुक्यातील तिन्हेवाडी मध्ये ९० मुले आणि ८२ मुली अशा दोन शाळा होत्या. आता त्यांचा एकत्रीत पट १७२ झाला आहे. मावळ खडकाळे येथे एका शाळेत ३५३ मुले आणि दुसऱ्या शाळेमध्ये १८८ मुली होत्या, आता ही शाळा एकत्रीत करण्यात आल्यामुळे त्यांची पटसंख्या ५४१ झाली आहे.शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील मुलांच्या शाळेमध्ये ४३२ पट होता, तर मुलींच्या शाळेत ४१८ पट होता. आता दोन्ही शाळेचे एकत्रीकरण झाल्यामुळे एकूण पटसंख्या ८५० झाली आहे. शाळांचे एकत्रीकरण करण्यासाठी मंजुरी मिळण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या प्रशासक सल्लागार समितीने मंजुरी दिलेली आहे. सदर शाळांचे एकत्रीकरण केल्यामुळे मुले व मुलींना एकत्रित शिक्षण घेता येईल. तसेच, शालेय प्रशासन, व्यवस्थापन व सहशालेय उपक्रम यामध्ये सुसूत्रता येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
शालेय उपक्रम प्रभावीपणे राबविता येणार
एकत्रीकरण करण्यासाठी संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीने प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्व तालुक्यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार खालील शाळांचे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेले होते. भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती यांना सोयीचे होणार आहे. एकाच आवारातील मुले आणि मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण झाल्यामुळे समूह शाळा, गुणवत्ता आणि शालेय उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले.