पुणे : उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी अनेक वाहन विक्रेते परवाने घेतले आहेत. गुढी पाडव्याला वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे शोरूममध्ये गर्दी होणार आहे. ही बाब विचारात घेऊन काही शोरूम चालकांनी चार ते पाच दिवस उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी ३० जूनपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. परंतु, नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या रोझमार्टा कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना आपल्या वाहनांना नंबर प्लेट लावण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कधी नंबर प्लेट नोंदणीसाठी वेबसाईट बंद होणे, फिटमेंट सेंटर अचानक बंद करणे, नागरिकांनी नोंदणी केले तरी वेळेवर नंबरप्लेट न येणे, अशा तक्रारीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनधारकांनी नंबर प्लेट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत. परंतु, फिटमेंट सेंटरची संख्या कमी असल्यामुळे दिवसा दोन ते अडीच हजार नंबर प्लेट लावण्यात येत आहेत. शिवाय नोंदणीची संख्या जास्त आहे. यामुळे वाहनधारकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.
गुढी पाडव्याला खरेदीचे प्रमाण वाढले
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे नवीन गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. ती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या काळात उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंद केल्याचे शोरूम चालकांनी सांगत आहेत. त्यामुळे नंबर प्लेट लावणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष
पुण्यात २६ लाख वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावावी लागणार आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना दोन-तीन महिन्यानंतरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरने अचानक काम बंद केले. त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
नंबर प्लेट लावण्यासाठी १९ मार्च तारीख होती. अजूनही नंबर प्लेट आली नाही. फिटमेंट सेंटरला गेल्यावर कर्मचारी अरेरावी करतात. याचा सामान्य लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. - बाळासाहेब पोकळे, रिक्षा पंचायत