जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान
By Admin | Updated: January 14, 2017 03:10 IST2017-01-14T03:10:07+5:302017-01-14T03:10:07+5:30
राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान होत्या, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) इंदापूर

जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान
इंदापूर : राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान होत्या, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) इंदापूर महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शिवभक्त परिवार व तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पाटील म्हणाले, की जिजाऊंनी शिवरायांना एकता व सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील राष्ट्रभक्ती निर्माण होऊन हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. स्वामी विवेकानंदांनी युवा शक्ती हीच राष्ट्राची शक्ती आहे. युवकांनी राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे.
लक्ष लढाक संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या, की सीमेवर शूरपणे लढणाऱ्या सैनिकांमुळे देश व नागरिकांचे संरक्षण होत असते. त्यामुळे सैनिकांचे शौर्य लक्षात घेऊन युवा पिढीने देशसेवेला प्राधान्य द्यावे. कामधेनू परिवाराचे संस्थापक डॉ. लक्ष्मण आसबे यांचे ‘रणरागिणी माँसाहेब जिजाऊ’ या विषयावर भाषण झाले.
कोल्हापूर येथील राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिवकालीन मर्दानी चित्तथरारक खेळांनी उपस्थितांची मने जिंकली. संदीप सावंत यांच्या ऐतिहासिक शस्त्रसंग्रहाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, भरत शहा, बापू जामदार उपस्थित होते. विजयकुमार फलफले यांनी सूत्रसंचालन केले. सोहम घोडके यांनी आभार मानले.
संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या हस्ते वीरमाता बायडाबाई दत्तात्रय रास्ते यांना पहिला जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लिंगाणा किल्ला सर करणाऱ्या १९ शिवभक्तांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मालोजीराजे भोसले यांची प्रतिमा संस्थेचे सचिव मुकुंद शहा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. (वार्ताहर)