कार्तिकी वारीच्या तोंडावर इंद्रायणी झाली फेसाळ; भाविकांची होणार गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:10 PM2023-12-01T19:10:38+5:302023-12-01T19:11:44+5:30

आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे....

Indrayani foamed on Kartiki Vari's face; Devotees will be inconvenienced | कार्तिकी वारीच्या तोंडावर इंद्रायणी झाली फेसाळ; भाविकांची होणार गैरसोय

कार्तिकी वारीच्या तोंडावर इंद्रायणी झाली फेसाळ; भाविकांची होणार गैरसोय

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : कार्तिकी यात्रा अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. त्यातच जलप्रदूषणामुळे आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी रसायनयुक्त फेसाने फेसाळलेली आहे. आळंदीत वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी व पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्यातरी गटारीचे नसून पवित्र इंद्रायणी नदीचे आहे. पिंपरी - चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायन मिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शीना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे.

इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दुरोगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालणार का, असा सवाल स्थानिक जनतेकडून उपस्थित होत आहे.

आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येत्या ५ डिसेंबरपासून माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी यात्रा आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होत सोहळ्यानिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करणार आहे. विशेषतः अनेक भाविक नदीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र सद्यस्थितीतील इंद्रायणीची अवस्था पाहता भाविकांनी स्नान किंवा पाणी प्राशन करावे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Indrayani foamed on Kartiki Vari's face; Devotees will be inconvenienced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.