पुणे : सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी व कंत्राटी भरतीच्या विरोधात राज्यातील सुमारे ३० हजार परिचारिकांनी शुक्रवार (दि.१८) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्य परिचारिका संघटना पुणे शाखेच्या अध्यक्षा आरिफा शेख, सचिव विनय देसाई यांच्या नेतृत्वाखाली ससून सर्वोपचार रुग्णालयातील ३५० हून अधिक परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने ससूनच्या रुग्णसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.
पुणे शहरातील सुमारे ५०० हून अधिक परिचारिकांनी या राज्यव्यापी बंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा संघटनेच्या अध्यक्षा आरिफा शेख यांनी केला आहे. यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या कामावर परिणाम झाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियोजनासाठी धावपळ होत आहे. रुग्णसेवेसाठी प्रशिक्षणार्थी परिचारिकांचे तात्पुरते साहाय्य घेतले जात असून त्यांची संख्या कमी पडत आहे. एकंदरीत परिचारिकांच्या बंदचा रुग्णसेवेवर परिणाम झाला असला तरी, प्रशासनाकडून मात्र सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा दावा केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आणि समविचारी संघटनांकडून १५ जुलैपासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. अद्याप कोणत्याच मागण्यांबाबत सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने परिचारिकांकडून कामबंद आंदोलन सुरूच आहे. बक्षी समितीच्या शिफारशीनुसार राज्यात २०१९ मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र, यात अधिपरिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिका व बालरोग परिचारिका यांना योग्य न्याय मिळाला नाही. २०२३ मध्ये जाहीर झालेल्या बक्षी समितीच्या दुसऱ्या अहवालातही वेतन त्रुटी कायम राहिल्याने परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेतन अन्यायाविरोधात खुल्लर समितीसमोर सादरीकरण करूनही समाधानकारक निर्णय झालेला नाही. शासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे परिचारिकांच्या संतप्त भावना अधिक तीव्र झाल्या आहेत.