पुणे : दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी येथे घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका ५५ वर्षीय नराधमावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार २९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत पीडित मुलीच्या घरात घडला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या ३२ वर्षीय आईने शुक्रवारी (दि. १) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून हबीब खान (५५, रा. वडगाव शेरी, पुणे) याला अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी फिर्यादी महिलेच्या नवऱ्याचा मित्र आहे. २९ फेब्रुवारी रोजी हबीब हा फिर्यादी यांच्या घरातील बंद पडलेला फॅन दुरुस्त करण्यासाठी आला होता. फॅन दुरुस्त करत असताना त्याने फिर्यादी यांच्या दहा वर्षाच्या मुलीला बोर होत आहे का? अशी विचारणा करून त्याच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ दाखवले. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करून विनयभंग केला. पोलिस उपनिरीक्षक नागवडे तपास करत आहेत.