इंदापूरला बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:52 IST2018-09-25T00:52:39+5:302018-09-25T00:52:51+5:30
रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो.

इंदापूरला बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
पळसदेव - रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो; मात्र पाऊस नाही प्रचंड उकाडा मात्र निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत.
तलाव कोरडे, पाऊस नाही, विहिरींची पाणीपातळी कमी होत आहे. अशा तिहेरी मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. एकीकडे खडकवासला कालवा व नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरून सत्ताधारी व विरोधक नेत्यांमध्ये राजकारण सुरू आहे; मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. काहीही होवो आमच्या पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बाजरी पीक तर जळून गेले, आता उसाचे काय होणार, अशी चिंता शेतकºयांना वाटू लागली आहे. एकीकडे हुमणी सारख्या रोगाने उसाला संपूर्ण ग्रासले आहे. औषधे फवारणी करून ही हुमणी आळी नष्ट होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाऊस नसल्याने अनेक मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ भटकंती करत आहेत.
पाण्याच्या प्रश्नावर प्रथमच इंदापूर तालुक्यात असे एवढे वाईट दिवस आले नव्हते; मात्र चार वर्षांत शेतकºयांची हेटाळणी म्हणायची की दोष, अशी चर्चा सुरू आहे, दरम्यान शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
पाण्याचे राजकारण नको : नागरिकांची अपेक्षा
इंदापूर तालुक्यातील राजकारण दूषित - दौंड तालुक्याच्या राजकारणानंतर इंदापूर तालुक्यात राजकारण सुरू आहे. विशेषत: पाणप्रश्नावर आमदार व माजी मंत्री यांची जुगलबंदी चालते; मात्र जनतेच्या पदरात काहीच पडत नाही. याच्या अगोदर अनेक नेते मंडळी आमदार होऊन गेले. त्यामधे कै. शंकरराव पाटील, कै. राजेंद्र कुमार घोलप, कै. गणपतराव पाटील या माजी आमदारांनी राजकारण विरहित कार्य केले. सध्याचे राजकारण मात्र वेगळे सुरू असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.