Pune Crime | इंदापूर पोलीसांनी पकडला १८ लाख रुपयांचा गुटखा; दोन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 14:23 IST2023-03-30T14:22:27+5:302023-03-30T14:23:03+5:30
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाजवळ इंदापूर पोलिसांनी पकडला...

Pune Crime | इंदापूर पोलीसांनी पकडला १८ लाख रुपयांचा गुटखा; दोन जणांना अटक
इंदापूर (पुणे) : अकलूज-इंदापूर राज्य रस्त्यावरुन पुण्याला निघालेला १८ लाख ८ हजार ८०० रुपयांचा गुटखा मंगळवारी (दि. २९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाजवळ इंदापूर पोलिसांनी पकडला. दोघांना अटक करण्यात आली.
प्रकाश कुशान हेगरे (वय २६ वर्षे, रा. कोकटनूर, ता. अथनी, जि. बेळगाव), मल्लू जयश्री मेलगडे (वय- १८ वर्षे, रा. अर्जुनगी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात गुटख्यासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली ६ लाख रुपयांची पिकअप असा २४ लाख ८हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार सुनील बालगुडे व पोलीस शिपाई विकास राखुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूज ते इंदापूर राज्यमार्गावरुन गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतरांच्या पथकाला कारवाई करण्याचा आदेश दिला.
त्यानूसार या पथकाने दि. २९ मार्चच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बावडा ते इंदापूर राज्यमार्गावर सापळा रचला. दरम्यानच्या काळात एक संशयित पिकअप (क्र.एम.एच.१३ डी.क्यू. २४९६) येताना दिसली. तिला थांबवून तिच्यामध्ये गुटखा आढळून आला. गाडी चालक व त्याच्या साथीदाराला अटक करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील पुढील तपास करीत आहेत.