इंदापूर : ‘नकारात्मक आणि व्यक्तिद्वेषावर आधारित राजकारणाला पाठिंबा देऊ नका. विकासाचा विचार करा आणि पुढील पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्या,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला इंदापूरकरांनी ठोस प्रतिसाद दिला आहे. आज जाहीर झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निकालातून नगरपरिषदेची सत्ता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओंजळीत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोयीप्रमाणे राजकीय भूमिका बदलणाऱ्या स्थानिक राजकारण्यांना मतदारांनी चोख संदेश देत, चांगली प्रतिमा, शहर विकासाची स्पष्ट दृष्टी आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व निवडले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये इंदापूर नगरपरिषदेची मागील पंचवार्षिक निवडणूक झाली होती. मात्र, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. प्रशासक राजवटीत शहर विकासाची संकल्पनाच मागे पडली.
माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या काळात स्वच्छता आणि नियोजनबद्ध कामांमुळे शहराला आलेली शिस्त निवडणूक रखडल्याने हळूहळू ढासळू लागली. अखेर यंदाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला. निवडणुकीपूर्वी सर्वच प्रमुख पक्षांनी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नगराध्यक्षपदासाठी भरत शहा यांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले.
हर्षवर्धन पाटील आणि शहा बंधूंमधील ताणलेले संबंध पाहता, भरत शहा यांना आपल्या गोटात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शहा यांना पक्षात घ्यावे. मात्र, लगेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊ नये, असा आग्रह धरला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार या भूमिकेला अनुकूल नव्हते. यामुळे गारटकर यांचा आग्रह अट्टहासात बदलला आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दर्शवली.
या घडामोडींचा फायदा घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेतला. आप्पासाहेब जगदाळे यांच्या माध्यमातून शहा बंधूंशी सांगड घालण्यात आली आणि झटक्यात भरत शहा यांचा पक्षप्रवेश झाला. तोपर्यंत नगराध्यक्षपदासाठी कोणाचीही उमेदवारी दाखल झाली नव्हती. त्यानंतर मात्र उमेदवारी प्रक्रियेला वेग आला.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे कारण पुढे करत प्रदीप गारटकर यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली ‘कृष्णा-भीमा विकास आघाडी’ स्थापन करत गारटकर यांना पाठिंबा दिला. शहा बंधूंशी मतभेद असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलही या आघाडीत सहभागी झाले. चौक सभा, कोपरा बैठका घेऊन वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करण्यात आला.
राजकीय पेचाचा फायदा
१९९२ ते २०१७ या कालावधीत प्रदीप गारटकर आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील सत्तेत असताना इंदापूरचा अपेक्षित विकास झाला नाही, हे वास्तव मतदारांच्या लक्षात होते. तसेच २०१७ ते २०२२ या काळात अंकिता शहा व भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासकामे आपल्या मार्गदर्शनाखालीच झाली, असेही कोणी ठामपणे सांगू शकत नव्हते. या राजकीय पेचाचा पुरेपूर फायदा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला.
स्वच्छ प्रतिमा, घराघरांत असलेला संपर्क
‘सत्ता नसतानाही मी इंदापूरच्या विकासासाठी निधी दिला आहे. एकदा सत्ता द्या, शहराचा कायापालट करून दाखवतो,’ या भरणे यांच्या ठाम आवाहनाला मतदारांनी निर्णायक प्रतिसाद दिला. भरत शहा यांची स्वच्छ प्रतिमा, घराघरांत असलेला संपर्क, संपूर्ण शहा कुटुंबाची एकजूट, सारिका भरणे यांनी घेतलेले अविरत परिश्रम आणि खुद्द दत्तात्रय भरणे यांनी कायम ठेवलेला जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूर नगरपरिषदेवर स्पष्ट बहुमत मिळाले, हे निकालातून ठळकपणे दिसून आले आहे.े
Web Summary : Indapur voters rejected negative politics, choosing development under Ajit Pawar's leadership. Bharat Shah's clean image and Dattatray Bharne's efforts secured NCP's victory in the Nagar Parishad election.
Web Summary : इंदापूर के मतदाताओं ने नकारात्मक राजनीति को खारिज कर दिया, अजित पवार के नेतृत्व में विकास को चुना। भरत शाह की स्वच्छ छवि और दत्तात्रय भरणे के प्रयासों ने नगर परिषद चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जीत सुनिश्चित की।