अवयवदानाविषयी वाढतेय जागृती; ससूनमध्ये यकृत व नेत्रदान यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:42 IST2017-10-14T16:08:18+5:302017-10-14T21:42:30+5:30
ब्रेन डेड घोषित केलेल्या ६१ वर्षीय महिला रूग्णाचे यकृत व नेत्र पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेणार्या रूग्णांना दान ससून रूग्णालयात करण्यात आले.

अवयवदानाविषयी वाढतेय जागृती; ससूनमध्ये यकृत व नेत्रदान यशस्वी
पुणे : ससून रूग्णालयात ब्रेन डेड घोषित केलेल्या ६१ वर्षीय महिला रूग्णाचे यकृत व नेत्र पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेणार्या रूग्णांना दान करण्यात आले.
खासगी रूग्णालयासोबतच आता ससून सारख्या सरकारी रूग्णालयामध्ये देखील अवयव दान करण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये जागृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. बिबवेवाडी येथील महिला रूग्णाच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे बुधवारी (दि. ११) ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनच्या ट्रॉमा अतिदक्षता विभागातील डॉक्टर व समाजसेवकांनी नातेवाईकांचे प्रबोधन केले. त्यानंतर नातेवाईक महिलेचे यकृत व नेत्रदान करण्यास तयार झाले. ससून रुग्णालयातील डॉ. हर्षल राजशेखर, डॉ. मंदार धामनगावकर, डॉ. हरिश्चंद्र उम्रजकर आणि भूलतज्ज्ञ डॉ. संयोगिता नाईक यांनी महिला रूग्णाचे यकृत व नेत्राचे गरजू रुग्णांना त्याचे दान करण्यात आले. डॉ. हरिष टाटीया व वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक अर्जूून राठोड यांनी डेड. टी. सी. सी. व रूग्णाचे नातेवाईक व अन्य सर्व यंत्रणेशी समन्वय साधून अवयव यशस्वी केले.
ससूनमार्फत आतापर्यंत १२ अवयवांचे दान
शासनाच्या महाअवयवदान जनजागृती अभियानामुळे समाजामध्ये अवयवदानाचा सकारात्मक संदेश मोठ्या प्रमाणावर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षात ससून रूग्णालयामधून मेंदू मृत झालेल्या रूग्णांचे एकूण १२ अवयवांचे दान करण्यात ससून रूग्णालयाच्या प्रशासनाला यश आले आहे. ससून रूग्णालयाची सध्या सुपर स्पेशालिटी रूग्णालय म्हणून ओळख वाढत आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता ससून रूग्णालय