स्वच्छ ससून; प्रसन्न ससून अभियान

By admin | Published: April 10, 2017 02:59 AM2017-04-10T02:59:21+5:302017-04-10T02:59:21+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ ते २१ एप्रिल या कालावधीदरम्यान ससून रुग्णालयात

Clean; Happy Sasson Campaign | स्वच्छ ससून; प्रसन्न ससून अभियान

स्वच्छ ससून; प्रसन्न ससून अभियान

Next

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ ते २१ एप्रिल या कालावधीदरम्यान ससून रुग्णालयात ‘स्वच्छ ससून, प्रसन्न ससून’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागासह ससूनचे अधिकारी व कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती ससूनच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.
‘स्वस्थ भारतासाठी स्वच्छ भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा घेऊन अनेक संस्था प्रेरणेने स्वच्छतेसाठी काम करीत आहेत. लोकसहभागामधून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामध्ये ससून रुग्णालयाशी संबंधित सर्व संस्था, कर्मचारी वृंद, विविध कंपन्या, सेवाभावी संस्था, गणेश मंडळ, रुग्णालय साहित्य आणि औषध विक्रेते संस्था सहभागी होणार आहेत. अभियानादरम्यान, दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ओपीडी, इन्फोसिस इमारत, नर्सिंग विभाग व स्वयंपाकघर, दगडूशेठ प्रकल्प, महाविद्यालय परिसर आणि वसतिगृहाची स्वच्छता करण्यात येणार आहे. आजवर केवळ बाह्य विभागातच स्वच्छता मोहीम राबवली जात होती. या वेळी रुग्णालयाच्या अंतर्गत भागातही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.’
रुग्ण असलेल्या भागातही स्वच्छता करण्यात येणार आहे. रुग्णालयांची स्वच्छता ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. सीएलआर सर्व्हिसेस या कंपनीच्या कॉर्पोरेट सीएसआरच्या माध्यमातून ससूनमधील ३०० स्वच्छतागृहे आणि २५० मोऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात येणार आहेत. ससूनमधील ७० वर्षांहून अधिक जुन्या डे्रनेज लाइनमधील त्रुटी दूर करणे, कचरा गोळा करणे, कंटेनर व्यवस्थापन आदी बाबींसाठी पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा सहभाग घेतला जाणार आहे. रुग्ण तसेच नातेवाइकांना प्रसन्न वाटावे, यासाठी झाडांच्या कुंड्या लावण्यासोबत लोकांनी थुंकू नये यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. ही मोहीम कायमस्वरूपी
कशी राबविता येईल, याबाबत प्रयत्न असल्याचेही शिरोळे यांनी सांगितले.
ससूनचे अधिष्ठाता, पालिका अधिकारी यांची खासदार अनिल शिरोळे यांनी बैठक घेतली असून, ससूनमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. त्यासाठी पालिका स्वयंसेवकांचीही मदत घेणार आहे. रुग्णालयात जमा होणाऱ्या पाला पाचोळ्यापासून बायोगॅससारखा प्रकल्प सुरू करण्याचा विचार असल्याचे पालिकेचे घन कचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, सीएलआर सर्व्हिसेसचे गौरव पाठक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

ससूनच्या डे्रनेज लाइन, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, पार्किंग, अपुरे मनुष्यबळ यासह सर्वच बाबींचा विचार करून सर्वांगीण विकासासाठी एक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात येत आहे. त्यासाठी पालिका, ससून प्रशासन आणि संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली आहे. ससून रुग्णालय कायम स्वच्छ आणि चकाचक दिसावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनाही रुग्णालयात आल्यानंतर प्रसन्न वाटावे, हा उद्देश आहे.
- अनिल शिरोळे, खासदार

रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता मुरलीधर तांबे म्हणाले, ‘मागील वर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला होता. या वेळी ससूनचे ८०० कर्मचारी आणि डॉक्टर सहभागी होणार आहेत. ससूनमध्ये दरदिवसाला ओपीडीमध्ये दोन हजार रुग्ण येतात, तर वर्षाला साधारणपणे साडेसहा लाख लोक येतात. रुग्णालयात दररोज ५ ते १० हजार नागरिकांची ये-जा असते. सध्या रुग्णालयात १२९६ बेड आहेत; मात्र आवश्यकतेनुसार ते वाढवले जातात. यावर्षी पहिल्यांदाच वॉर्डांसह स्वच्छतागृहांचीही स्वच्छता केली जाणार आहे.’

Web Title: Clean; Happy Sasson Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.