राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या शेअर्स मध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST2021-05-19T04:11:53+5:302021-05-19T04:11:53+5:30
(प्रशांत ननवरे ) लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या ‘शेअर्स’ रकमेत आजपासून वाढ करण्यात आली ...

राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या शेअर्स मध्ये वाढ
(प्रशांत ननवरे )
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या ‘शेअर्स’ रकमेत आजपासून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार शेअर्सची रक्कम १० हजारांवरून १५ हजार करण्यात आली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे. तसेच निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची भीती व्यक्त होत आहे.
आता कारखान्याचे भागभांडवल वाढविण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी सहकार विभागाने पत्राद्वारे हे आदेश दिले आहेत. केंद्र शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती क्षमतेमध्ये आणि पुरवठ्यामध्ये वाढ करण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना राबविलेल्या आहेत. तसेच केंद्र शासनाचे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ५ टक्यावरुन २० टक्यापर्यंत वाढविण्याचे धोरण आहे. केंद्र शासनाने इथेनॉल निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातील १२६ साखर कारखान्यांच्या आसवणी प्रकल्पांना व्याज अनुदान देण्यास मंजुरी दिलेली आहे. तसेच साखर कारखान्यांपैकी ६७ सहकारी साखर कारखाने आहेत.
त्या सहकारी साखर कारखान्यांना विस्तारवाढ करण्यासाठी आणि उपपदार्थावरील प्रकिया करणाऱ्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे आवश्यक झालेले आहे. ज्याअर्थी सहकारी साखर कारखान्यांची वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची क्षमता क्षीण झालेली आहे. काही सहकारी साखर कारखान्यांचे नक्तमूल्य व एन. डी. आर. उणे असल्यामुळे वित्तीय संस्थाकडून कर्ज प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र शासनाच्या इथेनॉल निर्मिती धोरणाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी नवीन साखर आसवणी प्रकल्प, कार्यरत आसवणी प्रकल्पामध्ये क्षमतावाढ, शून्य प्रदूषण पातळी राखण्यासाठी इन्सीनेशन बॉयलर उभारणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना स्वनिधीची गुंतवणूक कमी पडत आहे. सहकारी साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भागभांडवलामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. भागभांडवलागध्ये वाढ झाल्याने स्वनिधीमध्ये वाढ होवुन नवीन प्रकल्प उभारताना कार्यरत प्रकल्पामध्ये क्षमता वाढ करताना, गाळप क्षमता वाढ करताना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे शक्य होणार आहे.
त्यमुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ खाली प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन शासन शेअर्स रक्कम वाढविण्याबाबत निर्देश दिले आहेत.
चौकट
राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत १०,००० रूपयांवरुन १५,००० रूपये करावी. सर्व सहकारी साखर कारखान्यांनी उपविधिमध्ये दुरुस्ती करुन भागांची दर्शनी किंमत १०,००० रूपयांवरुन १५,०००रूपये करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. आधीच शेतकऱ्यांचे सहकारी कारखान्यांकडे कोट्यवधी भागभांडवल जमा आहे. आता या निर्णयाने शेतकऱ्यांच्या हाती काय उरणार असा सवाल शेतकरी कृती समितीच्या वतीने व्यक्त होत आहे.
-------------------------
...हे तर सहकारावरील "तौक्ते "वादळ
हा निर्णय सर्वस्वी अन्यायकारक आहे. कोणालाही विचारात न घेतलेल्या या निर्णयाला शेतकरी कृती समितीचा विरोध असेल. एक प्रकारे हे सहकारावरील तौक्ते वादळच आहे. याचे सहकारावर दूरगामी परिणाम होतील. सहकार वाचविण्यासाठी या निर्णयाचा फेरविचार व्हावा.
पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, राज्य साखर संघ