किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:32+5:302021-02-05T05:18:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस? अशी केली जाणारी विचारणा किंवा रस्त्यावरून जाताना लागलेला गाडीचा ...

किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस? अशी केली जाणारी विचारणा किंवा रस्त्यावरून जाताना लागलेला गाडीचा धक्का अथवा विशिष्ट घटनेविषयी मनात असलेला राग अशा किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रागावरचे नियंत्रण सुटून दुसऱ्याला जिवे मारण्यापर्यंत उचलले जाणारे पाऊल समाजासाठी चिंतेची बाब ठरू लागले आहे.
हडपसर येथील सय्यदनगर जामा मस्जिदबाहेर गल्ली क्रमांक १० मध्ये अशीच एक घटना घडली. दोघेजण या ठिकाणी थांबले असताना ‘तू माझ्याकडे का बघतोस’ असे विचारून एकाने आपल्या मित्राला बोलावून पाहणाऱ्याला लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केले. शाहाबाज जफर शेख (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये नाजीम शेख ( वय २३) आणि अजीम शेख (वय २३) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी वैमनस्यातून युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना येरवडा भागात घडली. दोघांना अटक केली. शुभम पवार (वय २१, रा. सेवालाल चौक, जयजवानगर, येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पवार याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दर्शन रुपसिंग राठोड (वय १९), रवी उर्फ लाल्या गोविंद चव्हाण (वय ३०) यांना अटक केली. दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पवारने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार त्याचा भाऊ सुमीत, पप्पू कांबळे दोन दिवसांपूर्वी सेवालाल चौकात रात्री आठच्या सुमारास गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी पूर्वी झालेल्या भांडणातून राठोड, चव्हाण आणि साथीदारांनी पवार याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.